कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:33 PM2022-09-07T17:33:32+5:302022-09-07T18:17:41+5:30
पातळी सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते.
केज (बीड): शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसासाठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी झाली. परंतु, आज महाराष्ट्राचे राजकारण अमराठी लोक चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहित कंबोज, नवनीत राणा, किरीट सोमैय्या ही अमराठी नावे आता महाराष्ट्राचे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, अशांसाठी शिवसेना खंबीर आहे असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या केज येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी मंगळवारी आल्या होत्या. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख धिंडू पाटील, जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या तथाकथित शक्तीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या तथाकथित शक्तीचे देशाचे गृहमंत्री अमित शहा काल महाराष्ट्राचा दौरा करून गेले. शहा हे राज्यातील पीक परिस्थितीवर बोलतील. असे वाटले होते. मात्र हेक्टर आणि एकर या मधला फरक न कळणाऱ्या कृषिमंत्र्यांकडून अहवाल काय मिळाला असणार ? असा टोला त्यांनी लगावला.
भाजपसमोर शिवसेनेचे आव्हान
खासदार नवनीत राणा या सांप्रदायिक दंगली का उसळतात ? मेळघाटातील कुपोषण, अमरावतीचे आणि मतदार संघातील प्रश्न यावर कधी बोलणार, अशा चव सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे. यातच शिवसेनेची ताकद आहे. यावरून येणाऱ्या निवडणुकात भाजपासमोर शिवसेनेचेच मोठे आव्हान उभे आहे हे स्पष्ट होते, असेही अंधारे म्हणाल्या.