डोक्यात दगड घालून ८० वर्षीय वृद्धाचा खून; पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:07 PM2022-11-07T19:07:17+5:302022-11-07T19:07:57+5:30
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई - जुन्या आर्थिक वादातून ८० वर्षीय वृद्धाचा काठ्या आणि दगडाने मारहाण खून केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात अंबाजोगाई सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी आरोपी पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा बचाव आरोपींनी केला होता, मात्र प्रबळ युक्तिवादासह सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी त्यांचा दावा खोडून काढला.
अशी घडली होती घटना
खुनाची ही घटना सहा वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथे घडली होती. ८ मार्च २०१६ रोजी बळीराम दाजीबा वाघमोडे (वय ८०) हे सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास राक्षसवाडी येथील स्वतःच्या घरासमोर ओट्यावर बसले होते. यावेळी आरोपी रामप्रसाद भीमराव गडदे आणि त्याची पत्नी आशाबाई हे तिथे आले. जुन्या आर्थिक वादाचे कारण काढून रामप्रसादने सोबत आणलेल्या काठीने बळीराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले. त्याचवेळी आशाबाईने जवळ पडलेला दगड उचलून बळीराम यांच्या डोक्यात घातला. मारहाणीत जबर जखमी झालेल्या बळीराम यांचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री ११ वा. यांचा मृत्यू झाला.
पीआय सोमनाथ गिते यांनी केला तपास
सदरील प्रकरणात ९ मार्च रोजी मयत बळीराम पत्नी हौसाबाई यांच्या फिर्यादीवरून रामप्रसाद आणि आशाबाई या दोघांवर कलम ३०२, ३२३, ३४ अन्वये ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी दोन्ही आरोपींना ताबडतोब ताब्यात घेतले. बारकाईने या गुन्ह्याचा तपास करून गित्ते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात आरोपी जामिनावर बाहेर होते.
सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवाद
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. डी.डी. खोचे यांच्या न्यायालयासमोर झाली. एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मयत बळीराम वाघमोडे यांनी मद्य प्राशन केल्याचे शासकीय कागदपत्रातही निष्पन्न झाले होते, तसेच आरोपी रामप्रसाद याच्या अंगावरही जखमा होत्या. याचा फायदा घेत आरोपींनी बळीराम यानेच रामप्रसादला काठीने मारले आणि मारत असताना मद्याच्या नशेत तोल जाऊन ते खाली पडले आणि डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला असा बचाव केला होता. मात्र, बळीराम यांनी अत्यल्प मद्य प्राशन केले होते, आणि तेवढ्या कमी मद्याच्या अंमलाखाली तोल जाऊ शकत नाही असे डॉक्टरांच्या साक्षीने सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी सिद्ध केले. सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवाद आणि मयताची पत्नी हौसाबाई, नात स्वाती रामचंद्र वाघमोडे व अप्पाराव बाबुराव वाघमोडे या प्रत्यक्षदर्शींची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने रामप्रसाद आणि आशाबाई गडदे यांना दोषी ठरवले.
दांपत्याला जन्मठेप
सदरील प्रकारांत न्यायालयाने आरोपी पती-पत्नीस खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तर पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या हौसाबाईला मारहाण केल्याप्रकरणी आशाबाईला एक वर्ष शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने लक्ष्मण फड यांनी काम पहिले. तर, पैरवी अधिकारी म्हणून गोविंद कदम आणि कोर्ट ड्युटी शीतल घुगे यांनी कर्तव्य बजावले.