बांधकाम करताना दुर्घटना, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चुलता-पुतण्याचा झाला अक्षरशः कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:04 PM2023-05-27T19:04:35+5:302023-05-27T19:07:46+5:30
मिस्त्री कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा अक्षरशः कोळसा झाला.
गेवराई : तालुक्यातील मन्यारवाडी येथील एका घराचे प्लास्टरचे काम करत असताना विद्युत वाहिनीस स्पर्श झाल्याने मिस्त्री काम करणाऱ्या चुलता व पुतण्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. या घटनेत दोघांचा अक्षरशः कोळसा झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही मिस्त्री कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
फेरोज ईस्माईल शेख (३८) आणि समिर जुबेर शेख ( २६ दोघे राहणार संजय नगर गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मन्यारवाडी येथील रामजी डिगंरे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. येथे फेरोज ईस्माईल शेख, समिर जुबेर शेख हे दोघे मिस्त्री काम करतात. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घराच्या समोरील भिंतीचे प्लास्टरचे काम सुरु होते. यावेळी तेथून गेलेल्या विद्युत वाहिनीस पुतण्या समिर जुबेर चिटकला. हे दृश्य पाहून चुलता फेरोज इस्माईल शेख वाचविण्यास धावला. मात्र, विजेचा जोरदार धक्का बसून दोघेही खाली कोसळले. मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा अक्षरशः कोळसा झाला.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे,पोलिस वायभसे,राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. समिरच्या पश्चात, पत्नी, दोन मुले तर फेरोजच्या पश्चात पत्नी चार मुले असा परिवार आहे.