घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:40 IST2025-04-11T12:37:10+5:302025-04-11T12:40:10+5:30
आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील घटना

घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले
- नितीन कांबळे
कडा (बीड) : गावातील किर्तन संपल्यानंतर रात्री घरी परतणाऱ्या वकिलाचा घरासमोर तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. तर नशिब बलवत्तर म्हणून त्यांचे वडिल बचावले. अमोल पंढरीनाथ पारखे ( ३०) असे मृत वकिलाचे नाव आहे. ही घटना हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली.
आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री किर्तन होते. ते संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान वकील अमोल पंढरीनाथ पारखे हे वडिल आणि चुलत भावासह घराकडे निघाले. मात्र, घराच्या समोर विद्युत वाहिनी तुटून पडली होती. अमोल व त्याचे वडील पंढरीनाथ यांच्या हाताला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ते दोघेही बाजूला फेकले गेले. यावेळी अमोल पारखे हे अत्यावस्थ होते. तर त्यांचे वडील जखमी झाले.
दरम्यान, अमोल यांना लागलीच आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.