सुटीत गावाकडे आलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी तलावात पोहताना बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:02 PM2024-06-19T17:02:44+5:302024-06-19T17:03:42+5:30
परळी - अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या भोपळा गावाजवळील तलावात पाणी भरपूर असल्याने परिसरातील अनेक जण येतात.
परळी: तालुक्यातील भोपळा येथील लघु तलावातील पाण्यात पोहत असताना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास २२ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. गणेश माणिकराव फड ( रा कन्हेरवाडी ) असे बेपत्ता युवकाचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गणेश हा पुणे येथे आभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून गेल्या पंधरवड्यात तो आपल्या गावाकडे सुट्टी साठी आला.
तलावात बेपत्ता झालेल्या गणेश फडचा शोध घेण्यासाठी नगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीतून शोध मोहीम चालू असलीतरी दुपारपर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता .तसेच परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पोहणाऱ्याची टीम ही तलावात दुपारी १२ पासून उतरून शोध घेत आहेत. घटनास्थळी परळी तहसीलदार व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
परळी - अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या भोपळा गावाजवळील तलावात पाणी भरपूर असल्याने परिसरातील अनेक जण येतात. उन्हाळ्यातही भोपळा तलावात पोहणाऱ्यांची गर्दी झाली होती. आज, १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कन्हेरवाडी येथील गणेश माणिकराव फड हा आपल्या काही मित्रासोबत भोपळा तलावात पोहण्यासाठी आला. पोहत असताना मित्र पुढे गेले आणि गणेश मागे राहिला. त्यानंतर गणेश फड बेपत्ता झाल्याचे समजले.
माहिती मिळताच अनेकांनी तलावात गणेशचा शोध घेतला. तसेच नपच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. दुपारपर्यंत बेपत्ता युवकाचा शोध लागला नव्हता. शोध मोहीम जोरात सुरू आहे. प्रशासनाकडून प्रयत्न जारी आहेत अशी माहिती परळी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे यांनी दिली. तलावाच्या ठिकाणी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे,गोविंद बडे यांनी भेट दिली.