अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 06:27 PM2022-04-05T18:27:52+5:302022-04-05T18:28:18+5:30
चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : देशसेवेने झपाटलेला तांड्यावरचा तरुण मेहनत व जिद्दीने सैन्य दलात भरती झाला. शेतकरी कुटुंबाचे नशीब पालटले. मात्र, कर्करोगासारख्या घातक आजाराने जवानाला गाठले अन् काही दिवसांतच होत्याचे नव्हते झाले. सुखी संसाराची कहाणी अधुरीच राहिली अन् देशसेवेचे स्वप्नही अपूर्णच राहिले.
तालुक्यातील राजेगाव येथील बाराभाई तांड्यावरील भारत रामराव राठोड (२९) या जवानाचा कर्करोगाने ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. ४ रोजी त्यांचे पार्थिव पुण्याहून बीडला आणले. बाराभाई तांडा येेथे त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. १९९३ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भारत राठोड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजेगाव येथे झाले. लहानपणापासूनच भारत यांना देशसेवेचे आकर्षण होते. काटक व पिळदार शरीरयष्टी व जिद्दीच्या जोरावर त्यांची २०१२ साली सैन्य दलात निवड झाली. नागपूर येथे काही दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर जम्मू येथे त्यांना नियुक्ती मिळाली. सध्या ते तेथेच कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते. मात्र, प्रकृती खालावत गेली, त्यानंतर ३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
कुटुंबीय शोकमग्न
भारतचे आई-वडील हे शेतीबरोबरच मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. त्यांच्यामागे एक लहान बहीण, भाऊ अशी दोन भावंडे, पत्नी व ५ व ३ वर्षांच्या दोन मुली असा परिवार आहे. भारत हे कुटुंबाचा आधार होते. मात्र, नियतीने त्यांना हिरावून नेल्याने कुटुंब शोकमग्न झाले.
दोन महिन्यांपूर्वीची भेट अखेरची
भारत राठोड हे दोन महिन्यांपूर्वी बाराभाई तांडा येथे आले होते. काही दिवस राहून ते कर्तव्यावर परतले होते. दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांच्या आठवणी जागवत कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.
बरा होऊन येईन....
दरम्यान, कर्करोगाचे निदान झाल्यावर भारत राठोड यांनी उपचार सुरू केले होते. कुटुंबीय काळजीत होते. तेव्हा त्यांनी धीर दिला होता. मी बरा होऊन लवकरच घरी येईन, असे ते म्हटले होते. मात्र, ते ते परतलेच नाहीत. त्यांच्या निधनाची वार्ता आल्यावर कुटुंबीयाला धक्का बसला.