आनंदवार्ता : बीडमध्ये कोरोनामुक्तीचे अर्धशतक; आणखी १० जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:27 PM2020-06-05T15:27:56+5:302020-06-05T15:30:12+5:30
कोरोनामुक्तांचे गावात परत जातात होत आहे स्वागत
- सोमनाथ खताळ
बीड : बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे अर्धशतकही पूर्ण झाले आहे. आता केवळ ११ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. बीडकरांसाठी ही आनंदाची बातमी राहिली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता. गुरूवारपर्यंत ४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. शुक्रवारी आणखी १० रुग्णांना प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात आले. यामध्ये बीड शहरातील २, तालुक्यातील साखरे बोरगावचे ३, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील १, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी २, परळी तालुक्यातील हाळंबचे २ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य विभागाने योग्य उपचार करून या सर्वांना कोरोनामुक्त करून घरी पाठविले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टिम परिश्रम घेत आहे.
गावात येताच स्वागत
कोरोनामुक्त होऊन परतलेल्या रुग्णांचे गावात स्वागत केले जात आहे. कोणी फुले उधळत आहे तर कोणी हालगी, टाळ्या वाजवून स्वागत करताना दिसत आहेत. खचलेल्या मनाला आधार देण्याचे काम ग्रामस्थ करीत असल्याने त्यांना दिलासा मिळत आहे. सुटी झाल्यानंतर हे सर्व लोक क्वारंटाईन ठेवले जात आहेत.