पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:22 PM2019-05-17T16:22:20+5:302019-05-17T16:23:56+5:30
माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगावला पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी आज (दि.१७ ) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आनंदगावची लोकसंख्या जवळपास 4 हजारावर आहे. मागील अनेक वर्षापासून गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या गावात टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो खुप अपूरा आहे. यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 'घागर मोर्चा' काढण्यात आला. गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजलगाव धरणातून पाईप लाईन करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोर्चामध्ये महिलांसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.