बीडमध्ये मंगल कार्यालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:07 AM2018-05-14T00:07:12+5:302018-05-14T00:07:12+5:30
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सुरक्षेच्या पातळीवर काळजी घ्यावी लागणार असल्याचा बोध मादळमोही येथील या घटनेवरुन घ्यावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सुरक्षेच्या पातळीवर काळजी घ्यावी लागणार असल्याचा बोध मादळमोही येथील या घटनेवरुन घ्यावा लागणार आहे.
मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी व आप्तांना निमंत्रित करावे लागते म्हणून व्यापक जागा असलेले मंगल कार्यालय मंगल कार्यासाठी भाड्याने घेतले जातात. या ठिंकाणी दिवसानुसार भाडे आकारले जाते. बीडसारख्या शहरी भागात मंगल कार्यालयांच्या केवळ भाड्यापोटी दीड ते दोन लाख रुपये यजमानांना मोजावे लागतात. ग्रामीण भागातही असे लोण पसरले आहे.
लाखो रुपयांच्या मोबदल्यात २४ तास सुरक्षा मिळेल याची खात्री मात्र कोणीच देत नाही. आपल्याकडे जागा आहे, त्यामुळे मोठ्या लग्न सोहळा करणा-यांना ती वाटेल ते भाडे देवून घ्यावीच लागेल असा भ्रम मंगल कार्यालय चालकांचा झाला आहे. मात्र ग्राहकांना पुरेशा सुविधा देण्याकडे बहुतांश मंगल कार्यालय चालकांचे दुर्लक्ष असते. मंगल कार्यालयातील विद्युत व्यवस्था, स्वयंपाकघरासह हॉल व खोल्यांमधील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसते. परिणामी लहान- मोठ्या दुर्घटना घडतात. तर खोल्यांमध्ये थांबणाºया वºहाडी, पाहुणे, नातेवाईकांचा ऐवज, किंमती साहित्य चोरीला जाण्याचे प्रकारही वाढले आहेत.
लग्न सोहळा ज्या स्टेजवर करण्याचे नियोजन असते, ते स्टेज सुरक्षित आहे काय? सजावट करताना वापरले जाणारे साहित्य, कमान, स्टेज मजबुती, क्षमता आदींचा विचार न करता स्टेज उभारले जाते. सोहळ्यातील संभाव्य गर्दी (क्राउड लोड) लक्षात घेवून सुरक्षात्मक उपाय करणे महत्वाचे असताना आॅर्डर मिळाल्याने केवळ सोपस्कर पार पाडले जातात. मंगल कार्यालय भाड्याने दिले असलेतरी तेथील सुरक्षेबाबत हमी देण्याची जबाबदारी सेवा देणाºया मंगल कार्यालय चालक व मालकांची असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने यजमान ग्राहक आणि सेवा देणारे मंगल कार्यालय चालक या विषयाकडे दुर्लक्ष करतात.
मादळमोही येथील घटना मोकळ्या जागेत असलेल्या स्टेजवरील कमान व भिंत कोसळल्याने झाली. घटनेवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी राहिली असती तर चेंगराचेंगरीही झाली असती. त्यामुळे मंगल कार्यालयात येणा-या व जाणाºया व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पुरेसे उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन व पोलीस यंत्रणेकडूनही मंगल कार्यालयांसाठी नियमावली जारी करणे महत्वाचे ठरणार आहे.
मंगल कार्यालयांचे पेव फुटले
बीड शहर व जिल्ह्यात मंगल कार्यालयांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. लहान मोठी ३५० मंगल कार्यालये आहेत. मालकीच्या मोठ्या जागेवर इतर व्यवसायापेक्षा मंगल कार्यालय सुरु करण्यावर अनेकांचा भर राहिला आहे. मात्र तेथे पैसे मोजणाºया ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
मंगल कार्यालये प्रशासनाच्या रडारवर
अधिक मासमुळे महिनाभरासाठी लग्नाचा धुमधडाका तुर्त थांबला आहे. मात्र त्यानंतर तिथी असल्याने पुन्हा लग्नांचे बार उडणार आहेत.मागील चार महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नतिथी होत्या. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालये आरक्षित होती. मंगल कार्यालयांनी या कालावधीत केलेले व्यवहार पाहता जीएसटीनुसार त्यांनी करभरणा केला आहे काय? याची तपासणी केली जात आहे.
फटाक्यांवर नियंत्रण हवे
मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम अथवा लग्न समारंभाच्या वेळी शोभच्या दारुचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दूर अंतराऐवजी परिसरातूनच उडविली जाते. मंडपाचे पडदे, लग्नासाठी आलेल्या लोकांपर्यंत फटाक्यांच्या ठिणग्या पसरतात. यजमानांचे भान नसते आणि मंगल कार्यालय चालकांचे लक्ष नसते. असे प्रकार टाळण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेकदा मोठी कोंडी होते. यासाठी पर्याय शोधण्याची गरज आहे.