अंगणवाडी मदतनीसाची आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:28 AM2018-06-11T05:28:32+5:302018-06-11T05:28:32+5:30
गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनीस निता भागवत शिंदे यांनी केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनीस निता भागवत शिंदे यांनी केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निता यांचे आधार कार्ड लिंक न झाल्यामुळे त्यांना तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नव्हते, तर मानधन रखडल्याने निता नैराश्येत होती, असे त्यांचे वडील भागवत शिंदे यांनी सांगितले.
निता यांच्या आत्महत्येची ग्रामविकास मंत्रालयाने दखल घेतली असून तत्काळ अहवाल मागविला आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी गुंतेगाव येथे शिंदे कुटुंबीयांना भेटून प्रकरणाची माहिती घेतली. सध्या आपली मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगून निताचे वडील भागवत यांनी काहीही लेखी दिले नाही.
सहा महिन्यांचे मानधन रखडले होते. त्यासाठी निता पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेली होती. दिवसभर बीडमध्ये थांबूनसुद्धा पालकमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. ती अधिकच वैफल्यग्रस्त झाली होती, असे भागवत शिंदे म्हणाले. घटनेनंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे.
मानधन मागणीचा अर्ज नव्हता
निता शिंदे या अंगणवाडी मदतनीस म्हणून नोव्हेंबर २०१७ मध्ये रुजू झाल्या होत्या. फेब्रवारीमध्ये बँक खाते दिल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारीचे मानधन देण्यात आले. उर्वरित मानधनाबाबत त्यांचा मागणी अर्ज नव्हता. प्रशासनाबद्दल तक्रार नसल्याचे सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले. सुसाईड नोटही नव्हती. आत्महत्येचे कारण व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करतील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी लोकमतला सांगितले.
ढिसाळ कारभाराची चौकशी
करा - नीलम गोºहे
पतीच्या निधनानंतर निता हिला अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळणारे मानधन हे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन होते. ती वयोवृद्ध वडिलांकडेच राहत होती. निता सरकारी व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराची बळी ठरली. प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.