अंगणवाडीसेविका 'नॉट रिचेबल' ; ऑफलाइन अहवालाचा ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:38 AM2021-09-15T04:38:39+5:302021-09-15T04:38:39+5:30
बीड : अंगणवाडीसेविकांना कामकाजाच्या नोंदीसाठी दिलेले स्मार्ट फोन शासनाकडे जमा करण्याचे आंदोलन झाले. जिल्ह्यातील दोन हजारांहून जास्त सेविकांनी ...
बीड : अंगणवाडीसेविकांना कामकाजाच्या नोंदीसाठी दिलेले स्मार्ट फोन शासनाकडे जमा करण्याचे आंदोलन झाले. जिल्ह्यातील दोन हजारांहून जास्त सेविकांनी त्यांच्याकडील मोबाइल शासनाला परत केले आहेत. त्यामुळे बाद झालेले रजिस्टर पुन्हा हाती घेण्याची वेळ अंगणवाडी ताईंवर आली आहे. मात्र दीड वर्षाच्या कालावधीत मोबाइलवर काही वेळेत केलेले कामकाज करणाऱ्या अंगणवाडी ताईंना रजिस्टरचे ओझे झाले असून, ११ प्रकारचे विविध रजिस्टर भरावे लागत आहे. या कामासाठी वेळ भरपूर लागत असून, लिहिण्याचा त्रास वाढला आहे.
शासनाने मोबाइल दिल्याने अंगणवाडी केंद्रांची डिजिटल वाटचाल सुरू झाली होती. शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांची माहिती ॲपद्वारे ऑनलाइनद्वारे भरण्यात येत होती. मात्र देण्यात आलेले मोबाइल हँग होणे, बॅटरी लवकर उतरणे, प्रादेशिक भाषेत ॲप नसल्याने अडचणी वाढल्या. त्यात दुरुस्तीसाठी खर्चाचा भुर्दंड सहन करण्याची वेळी आली. त्यामुळे अंगणवाडी सेविका आता नॉट रिचेबल असून, रजिस्टरचे ओझे सांभाळत त्यामध्ये माहिती लिहिता लिहिता त्यांची दमछाक होत आहे.
१) जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या-२,९५७
अंगणवाडीसेविका-२,४००
किती जणींनी केला मोबाइल परत-२०००
२) म्हणून केला मोबाइल परत
चार्जिंग करताना मोबाइल गरम होतो, तर काही ठिकाणी मोबाइल स्फोटाच्या घटना घडल्याने भीती असते. दुरुस्तीसाठी लागणारा खर्च पदरहून करावा लागत होता. त्याचा परतावा वेळेत मिळत नव्हता. दुरुस्तीसाठी येणारा खर्च एक हजाराच्या पुढे यायचा. पोषण ट्रॅकर ॲप सुरू होत नव्हते, झाले तर हँग होण्याचे प्रकार, इंग्रजी भाषेमुळे नोंदणी करताना अडचणी यायच्या त्यामुळे मोबाइल वापसी आंदोलन राज्यभरात झाले.
३) कामांचा व्याप
आरोग्य तपासणी, गरोदर महिलांचे लसीकरण, लहान मुलांचे लसीकरण, पोलिओ डोस, पूरक पोषण आहार, मुलांची हजेरी, मुलांचे वजन, उंचीच्या नोंदी आदी कामे पोषण ट्रॅकवर करावी लागत होती. आता शासनाकडे मोबाइल परत केल्याने या नोंदी ११ प्रकारांच्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवाव्या लागत आहेत. यातच
४) असून अडचण नसून खोळंबा
अंगणवाडीतील कामकाजाच्या नोंदी मोबाइलवर करण्याची सवय लागली होती. सर्वेक्षणासह सर्व माहिती दीड वर्षे ऑनलाइन भरली. आता ती रजिस्टरवर लिहावी लागते. त्यामुळे वेळ लागतो. लिहिण्याचा त्रास वाढला. पण मोबाइलदेखील नेहमी हँग होतो. मोबाइलवर काम सोपे होऊ शकते, पण मोबाइल चांगल्या दर्जाचा व क्षमतेचा असावा.
-- सारिका कदम, अंगणवाडीसेविका, पाटोदा
-----------
शासनाने मोबाइल दिल्याने कामे सुलभ होतील, असे वाटले होते. मात्र कामाच्या वेळी हँग होणे, गरम होणे, विविध माहिती भरताना अडचणी येणे, दुरुस्तीसाठी वारंवार करावा लागणाऱ्या खर्चामुळे काम करणे अडचणीचे होते. त्यामुळे मोबाइल शासनाला परत केले. कामे सुलभ होण्याच्या दृष्टीने शासनाने चांगल्या दर्जाचा मोबाइल किंवा टॅब द्यावेत. त्यातील ॲप मराठी भाषेतून असले पाहिजे.
-- संध्या मिश्रा, अंगणवाडीसेविका, बीड
५) मोबाइलचा वापर कामासाठी सुलभ
अंगणवाडीसेविकांनी मोबाइल वापसी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात केले आहे. बीड जिल्ह्यातही अंगणवाडी सेविकांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मोबाईल परत केले आहेत. शासनाकडे ऑनलाइन माहिती पोहोचविणे सुलभ असल्याने दिलेले मोबाइल परत न करता अंगणवाडीसेविकांनी ते वापरावेत. नियमित कामावर परिणाम होऊ नये म्हणून मोबाइल वापराबाबत आम्ही त्यांना विनंती केली आहे.
- चंद्रशेखर केकाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, बीड
--------------