अंगणवाडी सेविकांचा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 06:36 PM2023-02-20T18:36:09+5:302023-02-20T18:36:34+5:30
नादुरुस्त मोबाईल जमा करून दिले बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन
- अविनाश कदम
आष्टी ( बीड) : विविध मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर आज दुपारी २ वाजता मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर अंगणवाडी सेविकांनी नादुरुस्त मोबाईल जमा करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र शासनाने सन २०२२ च्या बजेट अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल घेण्यास दहा हजार रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप यावर अंमलबजावणी झाली नाही. यामुळे नवीन मोबाईल देत नाहीत तोपर्यंत जुन्या मोबाईलवर काम बंद चालू राहील असा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाईल बाल प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा केले आहेत. यावेळी प्रा गनीभाई शेख,आशा शेंडगे ,शोभा साठे,नसिंम सय्यद, उषा राऊत, रत्नमाला लाहोर,आशा वखरे,अलका सानप,रामकवर भोगाडे, संगीता गरुड, सुशीला बांगर, मथुरा कुत्तरवाडे,आर बी लोहार, रेश्मा चौधरी, वैशाली सुंबरे, सविता थोरवे,बिबी बेग,कुसुम थोरवे, यांच्यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
नादुरुस्त मोबाईलचा भुर्दंड सेविकांना
आष्टी तालुक्यात सन २०२१ मध्ये देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून ऑनलाईन कामकाजासाठी कुचकामी ठरले आहेत. या मोबाईलची वारंटी संपलेली असून हँग होणे, डिस्प्ले जाणे, बंद पडणे, चार्जिंग न होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. या मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे.