रापम कर्मचाऱ्यांमध्ये संताप, कामबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:22+5:302021-01-23T04:34:22+5:30

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर व त्याच्यासोबतच्या ...

Anger among Rapam employees, warning of strike | रापम कर्मचाऱ्यांमध्ये संताप, कामबंदचा इशारा

रापम कर्मचाऱ्यांमध्ये संताप, कामबंदचा इशारा

Next

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर व त्याच्यासोबतच्या गुंडांनी कार्यालयात येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. यात गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी अद्याप बांगर व सोबतच्या गुंडांना अटक केलेली नाही. आता रापम कर्मचारी आक्रमक झाले असून कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.

भांडार विभागातील एका महिला कर्मचाऱ्यावर कारवाई का केली, असे म्हणत वंचितचा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर याने आपल्या इतर ८ ते १० गुंडांसह कार्यालयात येऊन गोंधळ घातला होता. विभागीय नियंत्रक जगनोर यांना शिवीगाळ करण्यासह मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. यात पोलिसांनी आतापर्यंत केवळ तिघांना अटक केली असून मुख्य आरोपी बांगरसह इतर गुंड अद्यापही मोकाटच आहेत. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने झाल्यानंतर आता कर्मचारी कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई न केल्यास हे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशारा विविध संघटना आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

... तर वाहतूक होईल विस्कळीत

रापम कर्मचारी सध्या असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे ते काेणत्याही क्षणी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर सर्व वाहतूक विस्कळीत होईल. याने केवळ सामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांकडून आरोपींची पाठराखण

बांगर याच्याकडे वंचितचे पद आल्यापासून त्याने गुंडगिरी करण्यास सुरुवात केली आहे. आगोदर उसतोड कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता डीसींना कार्यालयात जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही पोलिसांकडून त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कोट

या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केलेली आहे. इतर आरोपी अद्यापही फरारच आहेत.

साईनाथ ठोंबरे

पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड

Web Title: Anger among Rapam employees, warning of strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.