पोलिसांना टीप दिल्याचा राग; टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:35 PM2023-12-08T13:35:27+5:302023-12-08T13:35:43+5:30
जुना वाद विकोपाला गेला ;सहा जणांच्या टोळक्याने तरूणाचा जीव घेतला!
- नितीन कांबळे
कडा- चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण काढत एका ३६ वर्षीय तरूणास सहा जणांनी धारदार चाकू,दगड,बांबूने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दैठणा येथे बुधवारी (दि.६) सायंकाळी घडली. एवन हैवान काळे ( रा.चिखली ता.आष्टी ) असे मयत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळपिंपळगांव येथे २०१७ रोजी चोरीची घटना घडली होती. यात काही आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांना आमचे नाव का सांगितले, असा जाब एवन काळे यास विचारत सहा जणांनी दैठणा येथील वाकी-मिरजगाव रोडवर ६ डिसेंबर रोजी सायंकाळी चाकू,दगड,बांबूने बेदम मारहाण केली. यात एवन काळे गंभीर जखमी झाला. अहमदनगर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, दिपक भोजे,मजरूद्दीन सय्यद, यांनी भेट दिली.दरम्यान, याप्रकरणी मयताची पत्नी सचिनाबाई उर्फ कांचन एवन काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी संदिप उध्दव काळे,कानिफनाथ उध्दव काळे,संदीप ईश्वर भोसले,कृष्णा विलास भोसले,अजय विलास भोसले,उध्दव आगुचंद काळे ( सर्व रा.वाकी ता.आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून पोलिस तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे अधिक तपास करत आहेत.
तपासाठी दोन पथके रवाना
सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्या नेतृत्वात दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील असे तपास अधिकारी चाटे यांनी सांगितले.