कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 04:52 PM2020-10-24T16:52:35+5:302020-10-24T16:56:20+5:30
बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो.
बीड : कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या घंटागाड्या व जेसीबी अशी बीड पालिकेच्या मालकीची वाहने एका महिलेने फोडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सदरील महिला स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणा देत होती. यात पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून याची अद्याप ठाण्यात नोंद नव्हती.
बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. याच डेपोच्या बाजुला अनेकांशी शेती आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. याच मुद्याला धरून सारीका गायकवाड नावाची महिला या मैदानावर पोहचली घंटागाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच कचरा ढकलण्यासाठी आलेल्या जेसीबीवर जावून काचा फोडल्या. यावर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत घोषणाबाजी केली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या तोडफोडीत पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वच्छता विभागाला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असले तरी याची उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झाली नव्हती.
कायदा हातात घेण चुकीचे
सदरील महिलेच्या मागणीवरून कचरा बाजुला घेतला जात होता. हे करत असतानाच महिलेने वाहनांची तोडफोड केली. कारवाई केली जात असतानाही कायदा हातात घेणे चुक आहे. यात पालिकेचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड