कत्तलखान्याकडे जाणारी १५ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:26 PM2020-12-18T12:26:57+5:302020-12-18T12:31:46+5:30
Crime News Beed पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धारूर-माजलगाव महामार्गावर तेलगावनजीक ही कारवाई केली
दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनातून १५ जनावरांना निर्दयपणे कोंबून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धारूर-माजलगाव महामार्गावर तेलगावनजीक ही कारवाई केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वृत्त असे की, गुरुवारी रात्रगस्ती दरम्यान दिंद्रुड पोलीसांनी जळगावकडून लातुरकडे जाणाऱ्या एका टेम्पोस ( एम एच 18 ए ए 80 31 ) संशयावरून थांबवले. तपासणीमध्ये टेम्पोमध्ये १५ बैल निर्दयपणे हवाबंद अवस्थेत कोंबल्याचे निदर्शनास आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्याकडे नेण्यात येत होती. पोलिसांनी जनावरांसह वाहन असा साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस उप निरीक्षक विठ्ठल शिंदे, वाहनचालक युनुस शेख, होमगार्ड अक्षय माने यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक समाहरिज उस्मान ( ३०, रा. जळगाव) , भिकनखान मोहम्मद खान (४५,रा.मालेगाव जिल्हा नाशिक) , जाकिर अब्दुल अब्दुल शहा (३० ,रा.बोरगाव ता. सिल्लोड) यांच्याविरोधात कलम 11 (1)(डी),11(1) (इ),11(1)(जी), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 व कलम 5 (ए) (1), 5(ए) 5 (बी),9 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या निर्देशानुसार पोलिस बिट अंमलदार अनिल भालेराव करत आहेत.