विशेष घटक योजनेतील जनावरे लाभार्थ्यांच्या दावणीला दिसेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:44+5:302021-07-28T04:34:44+5:30
नितीन कांबळे कडा : मागासवर्गीय समाजातील कुटुंबातील सदस्यांना आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद विभागाच्या माध्यमातून गाय, म्हैस गट दिले जातात. ...
नितीन कांबळे
कडा : मागासवर्गीय समाजातील कुटुंबातील सदस्यांना आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद विभागाच्या माध्यमातून गाय, म्हैस गट दिले जातात. यातून स्ववलंबी बनून उदरनिर्वाह करण्यासाठी विशेष घटक योजनेच्या माध्यमातून ही योजना तालुकास्तरावर राबवली जाते. पण याच योजनेतील लाभार्थ्यांनी घेतलेली लाखो रुपयांची जनावरे आजमितीला दावणीला दिसत नसल्याने याची चौकशी करून फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दरवर्षी मागासवर्गीय समाजातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष घटक योजनेचा लाभ देते. या योजनेतून गाय, म्हैस, शेळी गटासाठी अर्ज मागवले जातात व जिल्हा स्तरावरून त्याची सोडत केली जाते. त्यानंतर यावर निधी उपलब्ध होताच लाभार्थी, पशुसंवर्धन अधिकारी, विमा एजंटांच्या सोबतीने परजिल्ह्यातील जनावरांच्या बाजारातून त्याची खरेदी केली जाते. खरेदी करताना जनावर खरेदीच्या पावत्या, ताबा पावत्या व गावात पोहोच झालेल्या ग्रामपंचायतीचे पत्र घेतले जात असले तरी यात मात्र मोठी फसवणूक लाभार्थ्यांकडून केली जात आहे. लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील २२ लाभार्थ्यांनी दोन गायीप्रमाणे जनावरे घेतली. त्याची किमान तीन वर्ष संभाळ करून विक्री करू नये असे केल्यास पशुसंवर्धन विभाग कायदेशीर कारवाई करेल असे १०० रुपयांच्या दस्तावर लिहून घेतात. पण तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांकडून या योजनेत फसवणूक झाली असून अनेकांच्या दावणीला ही जनावरे नसल्याचे दिसून आले आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
तालुक्यात शासनाच्या विशेष घटक योजनेचा लाभ घेऊन खरेदी केलेल्या जनावरांच्या आमच्याकडे खरेदी पावत्या, गावात पोहोच झालेले ग्रामपंचायतीचे पत्र व फोटो जमा आहेत. आजमितीला ही जनावरे लाभार्थ्यांकडे नसतील तर पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल. - डाॅ. मंगेश ढेरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, आष्टी.
२२ गावातील लोकांना मिळाला लाभ
२०१९-२० मध्ये विशेष घटक योजनेतून आष्टी तालुक्यातील लोणी, वाळुंज, मांडवा, घाटा, हाजीपूर, डोंगरगण, देवळाली, जामगाव, पोरी, देसूर, खुंटेफळ, देविनिमगाव, जामगाव, खिळद, देऊळगावघाट, चिखली, हिंगणी, गहुखेल, टाकळसिंग ४ असे या गावातील मागासवर्गीय समाजातील २२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.