विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:42 PM2019-10-06T23:42:33+5:302019-10-06T23:44:06+5:30
जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
बीड : जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
शनिवारी जालना रोड भागातील माळी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत बाळासाहेब पिंगळे व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी सुनील अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, नवनाथ शिंदे, अशोक काळे, प्रकाश कोकाटे, कल्याण कवचट, सचिन काळे, लक्ष्मण गुंजाळ, कैलास लगड, देवा पेंढारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पिंगळे म्हणाले, शहरातील माळी नगर, विठ्ठल मंदिर परिसर हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शहराचा विकास आणि शासनाच्या विविध योजना कोण पाठपुरावा करून आणू शकतो, हे सर्वांना माहीत आहे.
ही विधानसभेची निवडणूक आहे आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याला विकासाची तळमळ आणि योग्य विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारा असावा. मागील काळात या भागात रस्ते, नाल्या, पाण्याची काय परिस्थिती होती हे आपण सर्वजण जाणता.
शहराचा कायापालट करण्यासाठी आण्णांसारखा चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व शांत, संयमी असा योग्य पर्याय आपल्यासमोर असून त्यांना विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पिंगळे म्हणाले.
यावेळी सुनिल अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, कैलास लगड, अशोक काळे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गुंंजाळ यांनी केले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापारी, महिला, पुरूष, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने शहराच्या विकासासाठी न्याय दिला नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला.
बीडच्या रेल्वेचे कामासाठी स्व.काकूंनी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन सरकाने थोडाफार निधी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले. पण मोदींसह पालकमंत्र्यानी बीडच्या रेल्वेच्या कामाला योग्य निधी देवून कामास गती दिली.
नॅशनल हायवेचे काम, अमृत अटल योजना, ड्रेनेज योजनेला निधी देवून राज्य आणि केंद्र शासनाने बीडकरांना न्याय दिला असून शहर विकासाचे काम करणाऱ्या अण्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.