भोंदूबाबाच्या अटकेसाठी अंनिसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:31+5:302021-05-18T04:35:31+5:30
: आडस येथील भोंदूबाबा वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) हा २० वर्षांपासून आडस, केज, धारूर व परिसरातील सामान्य, गरीब ...
: आडस येथील भोंदूबाबा वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) हा २० वर्षांपासून आडस, केज, धारूर व परिसरातील सामान्य, गरीब व भोळ्याभाबड्या लोकांना गुप्तधन काढून देतो, करणी, भानामती व भूतबाधेपासून मुक्ती देतो, असे सांगून लाखो रुपये उकळत असून, जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक व लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी आहेत. किल्ले धारूर ठाण्याच्या पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बीड जिल्हा कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केली आहे. या मागणीसाठी २१ मे पासून साथरोग कायद्याचे संपूर्ण पालन करून दोन प्रतिनिधी किल्ले धारूर पोलीस ठाण्यासमोर दररोज सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केज तालुक्यातील आडस येथील वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) नावाचा भोंदू व्यक्ती लोकांना त्याच्याकडे रिद्धीसिद्धी प्राप्त असल्याचे सांगून गुप्तधन, करणी, भानामती, भूतबाधा यांसह इतर समस्यांचे निराकरण करतो, असे सांगून मोठी रक्कम उकळतो. या व्यक्तीने भोंदूगिरी व फसवेगिरीद्वारे खूप पैसे कमावले असून, आता तो आपल्या आर्थिक ताकदीवर दहशत निर्माण करतो; मात्र आता महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आल्याने असे कृत्य या कायद्यानुसार मोठा गुन्हा असून, त्यासाठी जबर शिक्षेची तरतूद आहे. आडस येथीलच स्वाती दत्ता खाडे यांनी या बाबाने गुप्तधन व इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये उकळल्याची तक्रार केलेली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्ण ताकदीने तक्रारदारांच्या पाठीशी उभी राहणार असून, वरील भोंदू व्यक्तीला दोन दिवसात अटक करून कठोर कार्यवाहीची मागणीही बीड जिल्हा अंनिसने केली आहे. किल्ले धारुर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांना याबाबत निवेदन दिले आहे.