शेतकऱ्यांसाठी कोरोना महामारीत विशेष पॅकेज जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:51+5:302021-05-21T04:34:51+5:30
आष्टी : कोरोना महामारीत शेतकरी व शेतमजुरांना सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम ...
आष्टी : कोरोना महामारीत शेतकरी व शेतमजुरांना सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांना एमआरईजीएसमधून पगार द्यावा, ही मागणी मागील पंचवीस वर्षांपासून असून, ही मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षानेही केली आहे. आता त्यांची सत्ता आहे, त्यांनी ही मागणी पूर्ण करावी, असे आवाहन माजी आ. भीमसेन धोंडे यांनी केले. येथील पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात मंगळवारी सांयकाळी पत्रकार परिषदेत माजी आ. धोंडे बोलत होते.
कोरोनाची महामारी वाढतच असून, आष्टी येथे ऑक्सिजन प्लांटची मंजुरी मिळाली असली तरी अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. लवकरात लवकर आष्टी येथील ऑक्सिजन प्लांटचे काम करतानाच शिरूर आणि पाटोदा येथेही ऑक्सिजन उभारण्याचा विचार व्हावा. आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे मोफत अँटिजन चाचणी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, तत्काळ आवश्यक किट उपलब्ध करून गावेगावी अँटिजन चाचणी सुरू करावी आणि त्यासह लसीकरणही प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय करावे, अशी मागणीही माजी आ. भीमसेन धोंडे यांनी यावेळी केली. बऱ्याच दुकानदारांकडे मागील वर्षाचा खताचा साठा शिल्लक असून, तो मागील वर्षीच्याच भावात विक्री करावा, यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच आता पेरणीसाठी लागणारे बियाणेही सरकारने मागील वर्षाच्या भावातच द्यावे, अशी मागणी धोंडे यांनी केली.