घोषणा जिव्हारी लागल्यानेच मला पदावरून केले कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:46 AM2018-10-16T00:46:53+5:302018-10-16T00:47:36+5:30
गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्हाला आवडले का? असा प्रश्न राजेंद्र मस्के यांनी समर्थकांना आ. विनायक मेटे यांचे नाव न घेता विचारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्हाला आवडले का? असा प्रश्न राजेंद्र मस्के यांनी समर्थकांना आ. विनायक मेटे यांचे नाव न घेता विचारला.
राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने बीड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चºहाटा रोड येथील तुकाराम गुरुजीनगर या ठिकाणी सोमवारी आयोजित केली होती. यावेळी राजेंद्र मस्केंचे जवळपास चार हजार समर्थक कार्यकर्ते जमा झाले होते.
याप्रसंगी बंजारा समाजाचे नेते दिनेश पवार, सोमनाथ माने, संजय नलावडे, शहाजी गायकवाड, संघर्ष वडमारे, आहेर वडगावचे सरपंच पोपटराव रोहिटे, आंबेसावळीचे सरपंच प्रदीप गुंदेकर, पिंपरगव्हाणचे सरपंच बाबासाहेब शेटे, खंडाळाचे सरपंच चौरे, वाकनाथपुरचे सरपंच गोरख घाडगे, शिरापूर गात उपसरपंच बाळू गात, घोसापुरी सरपंच रामाराव बांड, हाजीपुर सरपंच रावण ठोंबरे, उमरद खालसाचे सरपंच बापूराव जाधव, तळेगाव सरपंच नारायण ढोरमारे, पिंपरनाई सरपंच बाळासाहेब वायभट, लहू देवकर, अभिजीत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ‘बीड का आमदार कैसा हो, राजेंद्र मस्के जैसा हो’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून काढला होता. मी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली म्हणून मला राजकीय किंमत चुकवावी लागत आहे. पण तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. जनतेची साथ असेपर्यंत ‘मी कुणाच्याही बापाला भीत नाही’ या शब्दात राजेंद्र मस्के यांनी पुढील राजकीय भूमिकेवर भाष्य केले.
या बैठकीत बोलताना मस्के असे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कार्यकर्ता रहावे, जसं की गड्याने कधी मालकच होऊ नये, या उक्तीप्रमाणे ते माझ्याशी वागले आहेत. परंतु आजपर्यंत काम करत असताना जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळेच दोन दोन वेळा आम्ही निवडून आलो, त्यामुळे निवडणुका कशा जिंकायच्या हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. इतरांनी आम्हाला शिकवू नये, असे ते म्हणाले.