सरकारची घोषणा केवळ जीआर काढण्यापुरतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:52 PM2018-11-07T23:52:29+5:302018-11-07T23:53:21+5:30
सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याला तर वाऱ्यावरच सोडले आहे का काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात आढावा बैठका घेतात मात्र बीड जिल्ह्याला टाळत असावेत असा टोलाही मुंडे यांनी लगावला.
जिल्ह्यात या वर्षी ऐन दिवाळीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंडे हे दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाच दिवस पाहणी, चर्चा आणि संवाद साधत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथून केली. यावेळी पाण्याअभावी उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर बर्दापूर येथील महादेव मंदिरात परिसरातील ७ गावांतील शेतकरी, दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. दुसºया दिवशी बुधवारी त्यांनी परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकºयांशी संवाद साधला. बुधवारी परळी तालुक्यातील नागापूर भागात दौरा केला. परळी भागातील शेतकºयांच्या उसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे, प्रसंगी आपण आपले प्राण गहाण ठेवू मात्र शेतकºयांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहू देणार नाही, असा दिलासाही त्यांनी शेतकºयांना दिला.
निसर्गासोबतच सरकारशी दोन हात करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल, असे ते म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने आपल्याला निसर्गासोबतच सरकारशीही दोन हात करावे लागणार आहेत, पाच वर्ष केवळ फसवणूकच केली. आताही तेच सुरू आहे, पाणी टंचाई, वीज टंचाई, चारा टंचाई असताना सरकार जाचक निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.
शेतकºयांच्या जनावरांना दावणीला चारा देण्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा सरकारचा निर्णय असाच तुघलकी असून, हे सरकार अनुदानासाठी जनावरांसोबत सेल्फी काढून पाठवा अशी मागणीही करेल, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत गोविंदराव देशमुख, रणजित लोमटे, माजी राजेभाऊ औताडे, विलास मोरे, शिवहार भताने, तानाजी देशमुख, सुधाकर शिनगारे, समीर पटेल, गणेश देशमुख, अजय मुंडे, माऊली गडदे, विष्णूपंत देशमुख, मोहनराव सोळंके आदी उपस्थित होते.