संतापजनक ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह १० तास पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:38 AM2020-09-19T10:38:09+5:302020-09-19T10:41:07+5:30
तहसीलदार यांना रात्रीच कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
माजलगाव : शहरातील एका कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले. त्याची माहिती प्रशासनाच्या सर्व विभागांना कळवली असतांनाही याकडे दुर्लक्ष केल्याने हा मृतदेह अंत्यसंस्काराशिवाय तब्बल 10 तास एकाच जागेवर पडुन होता. कोरोना प्रसार वाढत असताना अशा प्रकारामुळे प्रशासनाचेच याकडे गांभीर्य नसल्याचे पुढे आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
माजलगाव तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. शुक्रवारी शहरातील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये रात्री 10 वाजता एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचे निधन झाले. याबाबत येथील डॉक्टर व नातेवाईकांनी आरोग्य , महसुल ,नगरपालिका प्रशासनाला याची माहिती दिली. मात्र तब्बल दहा तास हा मृतदेह रुग्णवाहिकेत पडून होता. या मृतदेहावर तात्काळ अंत्यसंस्कार करणे नगरपालिकेचे काम असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगुनही ते रात्री न आल्याने मृतदेह सकाळी 8 वाजेपर्यंत रूग्णालयातच पडुन राहिल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
या बाबत तहसीलदार यांना रात्रीच कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या पुर्वीही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे एक मृतदेह 4 ते 5 तास पडुन होता. प्राशासनाने दुर्लक्ष केल्याने मृतदेहाची अवहेलना होत असल्याने मृताच्या नातेवाईकांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.