माजलगाव धरणात आणखी एक मृत्यू; डॉक्टरच्या शोधातील NDRF जवानाचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:08 PM2022-09-19T15:08:08+5:302022-09-19T15:12:51+5:30
११ जवानाच्या या पथकातील राजशेखर मोरे हा जवान शोधकार्य करताना गायब झाला होता
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : येथील धरणातून रविवारी सकाळी डॉ. दत्तात्रय फपाळ बुडाल्याची घटना समोर आली होती. मागील २४ तासांपासून त्यांचे शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, आज कोल्हापूर येथून आलेल्या एनडीआरएफच्या पथकातील शोधकार्य करताना जवानाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राजशेखर प्रकाश मोरे ( ३० ) असे मृत जवानाचे नाव आहे.
तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे त्यांचे खाजगी हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात. दररोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी ते पोहायला गेले असताना दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मच्छीमार, परळी व बीड येथील पथकाने त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला. रविवारी डॉक्टरचा शोध लावू शकला नव्हता. त्यामुळे सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. हे पथक पाण्यातून शोधकार्य करते.
दरम्यान, ११ जवानाच्या या पथकातील राजशेखर मोरे हा जवान शोधकार्य करताना पाण्यातून बाहेर आला नाही. त्यामुळे डॉक्टरसह जवानाचा शोध घेण्यात येत होता. अखेर चार तासांपासून गायब असलेला जवान अत्यवस्थ अवस्थेत सापडला. त्याला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. जवानाच्या पाठीवरील ऑक्सिजन सिलेंडर बाजूला गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.