बीडमधील आणखी एका गुंडाची हर्सूलमध्ये रवानगी
By सोमनाथ खताळ | Published: May 4, 2024 08:22 PM2024-05-04T20:22:40+5:302024-05-04T20:23:24+5:30
शेख अखिल शेख हसिनोद्दीन (वय ३१, रा. तेलगाव नाका, पेठबीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे. अखिलविरोधात जबरी चोरी करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, रस्ता अडविणे असे विविध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.
बीड : रस्ता अडविणे, चोरी करणे, धमक्या देणाऱ्या आणखी एका गुंडाची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बीड पोलिसांनी गुंडाला पकडून कारागृहात पाठविले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. शेख अखिल शेख हसिनोद्दीन (वय ३१, रा. तेलगाव नाका, पेठबीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे. अखिलविरोधात जबरी चोरी करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, रस्ता अडविणे असे विविध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.
यातील पाच गुन्हे न्यायप्रविष्ट असून, दोन गुन्हे पाेलिस तपासावर आहेत. अखिलविरोधात अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. परंतु, त्याच्या वर्तणुकीत काहीही सुधारणा होत नव्हती. अखेर बीड शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात एमपीडीए कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. याला मंजुरी मिळताच अखिलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई बीड शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.