आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय
By अनिल लगड | Updated: December 20, 2022 13:05 IST2022-12-20T13:03:40+5:302022-12-20T13:05:08+5:30
अभय मुंडे हे मुंडे-बहीण भावांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी बॅनरवर दोघांचेही फोटो लावून केला होता प्रचार!

आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय मुंडे हे विजयी झाले. दोन्ही मुंडेंचे अभय मुंडे चुलत भाऊ आहेत. अभय मुंडे यांनी दोघा बहीण-भावांचे बॅनरवर फोटो लावून प्रचार केला होता.
पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या गावात सरपंचपदासाठी चौरंगी लढत होती. पंकजा व धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंचपदाचे उमेदवार होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने आणि दोन अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले होते. मुंडे बहीण-भाऊ निवडणुकीच्या प्रचारात उतरले नसले तरी त्यांचे फोटो वापरून अभय मुंडे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ऐन निवडणुकीत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांचे बॅनरवरील फोटोची चर्चा रंगली होती. अखेर या निवडणुकीत अभय मुंडे हे निवडून आले. त्यांना ६४८ मते मिळाली. सदस्यांमध्ये मात्र राष्ट्रवादीला ५ तर भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. यामुळे ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.