स्वारातीमध्ये आणखी एक ऑक्सिजन प्लांट उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:23+5:302021-05-11T04:35:23+5:30
अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरपैकी अजूनही आठ व्हेंटिलेटर पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे वापरण्यात येत नसून हे व्हेंटिलेटर ...
अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरपैकी अजूनही आठ व्हेंटिलेटर पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे वापरण्यात येत नसून हे व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी या परिसरात आणखी एक ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट सुरू करण्याची मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे सध्या कोविड रुग्णांसाठी दोन आयसीयू वाॅर्ड आहेत. दोन्ही वाॅर्डमध्ये ३२ बेड आहेत; परंतु सध्या फक्त २४ व्हेंटिलेटरच चालू आहेत. आणखी ८ व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही ऑक्सिजन पुरत नसल्यामुळे ते बसविले नाहीत. सध्या आयसीयू बेड आवश्यक असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे; परंतु बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे रुग्णांवर उपचार होत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स हतबल होत आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनास वारंवार सांगूनही याबाबत कार्यवाही अद्याप झालेली नाही. आयसीयू बेड व्हेंटिलेटरसहित वाढविण्याबाबत प्रशासनास वारंवार सूचित केलेले आहे.
तरी आपण यावर कायमस्वरूपी मार्ग काढून आयसीयू बेड व्हेंटिलेटरसहित वाढविण्याबाबत आदेश द्यावेत.
यासोबतच केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे असलेले रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत; परंतु अँटिजन टेस्ट किट अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांचे टेस्टिंग करण्यात मोठा अडथळा येत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर अँटिजन टेस्ट किट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर), वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग,
संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, विभागीय आयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत.
वाॅर्ड १२ मध्ये होऊ शकते सोय
ऑक्सिजन प्रेशर नसल्यामुळे स्वारातीमधील उर्वरित व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले, तसेच मेडिसिन विभागाचे जुने वाॅर्ड क्र. १२ येथेही आयसीयू वाॅर्ड व्हेंटिलेटरसहित करता येऊ शकतो. त्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, तसेच आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध करून, तसेच ऑक्सिजन प्रेशरसाठी आणखी एक ऑक्सिजन प्लांट त्वरित उभा करणे आवश्यक असल्याचे आ. नमिता मुंदडा म्हणाल्या.