दुष्काळाने वसवले गावाशेजारी दुसरे अस्थायी समांतर गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:52 PM2019-04-13T23:52:38+5:302019-04-13T23:53:03+5:30
तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे.
विजयकुमार गाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे. त्यांच्या देखभालीसाठी माणसांची वर्दळ गावापेक्षा छावणीवर जास्त दिसून येत आहे.
सध्या लोकसभेच्या प्रचाराची धूम सुरू आहे. त्यात मतदारांच्या गळाभेटीसाठी या समांतर गावातच प्रचारकांना जावे लागत आहे.
अनेक वेळा दुष्काळ पाहिला. अनुभवला परंतु असा दुष्काळ कधी पाहिला नव्हता. संपूर्ण तालुकाच कोरडाठाक पडला. शेतीला सोडा, जिथे जनावरांना आणि माणसाला पिण्यासाठी लागणारे पाणी टँकरच्या माध्यमातून शेजारच्या तालुक्यात आयात करण्याची लाजिरवाणी वेळ प्रत्यक्षात अनुभवायला आली आहे.
किमान पन्नास किलो मीटर अंतर पाणी वाहतुकीसाठी पाण्याएवढे इंधन वापरावे लागत आहे. पाण्याबरोबर तालुक्यातील चारा संपुष्टात आला. शेतकरी पूर्णत: परावलंबी बनला. जनावर दावणीला राहतील किंवा नाही या भीतीने त्रस्त होता. छावण्या हाच एकमेव पर्याय असलेल्याने मागणी जोर धरत होती. अखेर चालण्याचे दरवाजे उघडले गेले. पाहता पाहता दिवसागणिक हा आकडा वाढत गेला.
गुरूवारी हाती आलेल्या आकड्यानुसार ४९ असून पैकी एक छावणी सुरू नसली तरी ४८ छावण्यांमधील राहत जनावरांची संख्या ३ हजार १८५ तर मोठ्या जनावरांची संख्या ३० हजार ४३ अशी एकूण ३३ हजार २२८ इतके पशुधन छावणीवर असल्याने छावण्या दुसरे गाव दिसू लागले. तर जनावरांच्या चारा पाण्यासाठी किमान दोन माणसे असल्याने गावात कमी छावणीवर जास्त वर्दळ आहे. म्हणून अनायासे जिथे माणसे तिथे प्राथमिक गरजा भागवण्यासाठी चहापाण्याचे छोटी हॉटेल, तंबाखू, सुपारी, बिडी काडी अशा किरकोळ गरजा पूर्ण करणारे अस्थाई दुकान तकलादू सावली तयार करुन सुरु आहेत. मध्यंतरी वादळी वाºयासह गारांचा मार खाण्याची वेळ निभावून गेली तरी तापत्या उन्हाबरोबर अचानक येणारे वारे बेचैन करून सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत हे समांतर गाव जिथल्या तिथे दिसणार आहेत.
सध्या लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्याने पक्षीय प्रचारक माणूस माणूस शोधून मतांचे दान पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यासाठी त्यांनाही छावण्यावरचे हे विचित्र विश्व पाहणे भाग पडत आहे.
आचारसंहिता पथकाला दिला गुंगारा
निवडणुका आदर्श आचारसंहितेच्या तत्वप्रणालीनुसार व्हाव्यात यासाठी प्रशासकीय स्तरावर स्वतंत्र निगराणी करत आहे. याउपरही त्या पथकाला ही गुंगारा देऊन आपले प्रचार तंत्र वापरले जाते. त्यासाठी मार्गाने - आडमार्गाने लोकशाहीतील निवडणूक जिंकण्याची पराकाष्ठा केली जात आहे.
छावणीचालकांची दमछाक
नियमांना बांधील राहून जनावरांना चारा पाणी, खुराक वेळेवर देणे बंधनकारक आहे. चौकशी तपासणी पथक भेटी, तालुक्याबाहेरून चारा पाणी आणणे हे काम करीत असताना चालकांची दमछाक होते ही गोष्ट नाकारता येत नाही. स्वीकारलेले काम नियमबाह्य होता कामा नये, हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण दुष्काळ हा सेवा करण्याची संधी आहे, मेवा मिळवण्याचा व्यवसाय नाही.