बीडमध्ये सावकारीचा आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 08:23 PM2017-09-18T20:23:55+5:302017-09-18T20:41:15+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले.
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आरोपींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागील दोन महिन्यात सावकारीचा हा तिसरा बळी आहे.
वैभव राऊत हे सामाजिक कार्यकर्ते होते. म्हाळसजवळा येथील जवळपास १० कोटी रुपयांचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतील घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. या योजनेत घोटाळा करणाºयांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा रोष होता. वर्षभरापूर्वी बीडमधील एका नगरसेवकाकडून राऊत यांनी व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दलाच्या दुप्पट रक्कम राऊत यांनी संबंधित खाजगी सावकारी करणाºया नगरसेवकाला परतही केली होती. त्यानंतर गावातीलच एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणाºया व्यक्तीच्या भावाकडून राऊत यांनी पैसे घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी ३ एकर जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवली होती.
हे सर्व पैसे परत करूनही राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयाचा व बीडमधील एका नगरसेवकाचा त्यांच्यावर दबाव होता. त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून वैभव यांनी सोमवारी सकाळी शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन केले. परिसरातील नागरिकांनी बीडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपींना अटक करा
वैभव राऊतसारख्या सामाजिक बांधिलकी असलेल्या व सर्वसामान्यांसाठी लढणाºया व्यक्तीचा बळी गेल्याने अस्वस्थ आहोत. आरोपींना अटक करून तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अॅड. सुभाष राऊत यांनी दिला.
मृतदेह जीपमध्येच
जोपर्यंत वैभव राऊत यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका वैभव यांच्या पत्नी, भाऊ व इतर नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला मृतदेह सायंकाळी ५ वाजेपर्यंत जीपमध्येच होता. सर्वसामान्यांसाठी झगडणाºया वैभव राऊत यांचा बळी गेल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. तेवढ्यात नातेवाईकही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मृतदेह पाहून सर्वांनीच टाहो फोडला.
पत्नी व भावाचा जबाब
५ तास पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर वैभव यांची पत्नी आशा व भाऊ विष्णू यांचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यांच्या जबाबांतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार होता. या जबाबानंतरच शवविच्छेदन होणार होते.
ग्रा.पं. निवडणुकीचे कारण
वैभव राऊत यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूक लढवू नको, म्हणून गावातील काही राजकीय पदाधिकाºयांनी दबाव आणला होता. हा दबाव झुगारून वैभव राऊत सोमवारी आपल्या आईचा ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते.
तीन दिवसांपूर्वी मारहाण
म्हाळसजवळा येथील बोगस मतदार यादीची चौकशी करावी, निवडणूक स्थगित करावी, या मागणीसाठी वैभव राऊत यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे अर्ज केला होता. यावर संतप्त काही कार्यकर्त्यांनी त्यांना तीन दिवसांपूर्वी तहसीलसमोर मारहाण केल्याचीही चर्चा जिल्हा रुग्णालयात ऐकावयास मिळाली.
तीन वेगवेगळे खोटे गुन्हा
वैभव हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते. हा राग मनात धरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात बलात्कार व खुनाचा प्रयत्न असे दोन, तर वडवणी पोलीस ठाण्यात वाटमारीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी वडवणीच्या गुन्ह्यात क्षमापत्रही पाठविल्याचे राऊत यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
जबाब घेतला
नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचा जबाब घेतला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक केली जाईल.
- सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक