सकाळी भ्रष्टाचारविरोधी शपथ, दुपारी लाचखोरी; गेवराईत एसीटीचा आगारप्रमुख सापळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 07:01 PM2021-10-27T19:01:02+5:302021-10-27T19:09:19+5:30
आगारप्रमुख श्रीनिवास वागदरीकर याने लाच मागितल्याची तक्रार वरिष्ठ लिपिकाने केल्यावर औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली.
बीड/गेवराई : लाच घेणार नाही... भ्रष्टाचार करणार नाही...अशी शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच तासांत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या गेवराई येथील आगारप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. २६ ऑक्टोबरपासून भ्रष्टाचारविरोधी सप्ताहाला सुरुवात झाली. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार विरोधी शपथ घेणे बंधनकारक होते. श्रीनिवास केरबा वागदरीकर (३४) वर्ग-२ असे त्या आगारप्रमुखाचे नाव आहे.
त्याने राज्य परिवहन महामंडळाच्याच वरिष्ठ लिपिकाकडून लाच स्वीकारली. ५ ऑक्टोबर रोजी विभागीय भांडार अधिकाऱ्यांनी गेवराईच्या आगाराला सरप्राईज भेट दिली होती. यावेळी भांडार शाखेत पुरवठा केलेल्या साहित्याची त्यांनी पडताळणी केली. मात्र, बसेसचे दोन ते तीन साहित्य कमी आढळले. साहित्यात आढळलेल्या तफावतीची विभागीय भांडार अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत आगारप्रमुखांना भांडार शाखेचा कारभार पाहणाऱ्या वरिष्ठ लिपिकाविरुद्ध कारवाईसाठी अहवाल मागविला.
दरम्यान, निलंबन टाळण्यासाठी कर्तव्यात कुचराई केली नाही, असा सोयीचा अहवाल वरिष्ठांना देण्यासाठी आगारप्रमुख श्रीनिवास वागदरीकर याने वरिष्ठ लिपिकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागणी केली. लिपिकाने याबाबत औरंगाबाद येथील एसीबीकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, अंमलदार राजेंद्र जोशी, मिलिंद इप्पर, केवलसिंग घुसिंगे, चालक चांगदेव बागूल यांच्या पथकाने २६ रोजी सापळा लावला. बसस्थानकातील हॉटेलजवळ १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच वागदरीकर यास झडप घालून पकडले. त्याच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दोन टप्प्यांत लाच...
आगारप्रमुख श्रीनिवास वागदरीकर याने लाच मागितल्याची तक्रार वरिष्ठ लिपिकाने केल्यावर औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली. मंगळवारी १५ हजार रुपये तर उर्वरित १० हजार रुपये गुरुवारी देण्याचे ठरले होते. मंगळवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी वागदरीकर हा लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला.