विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आजपासून अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:15+5:302021-05-03T04:28:15+5:30
बीड : कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करूनही काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आटोक्यात येत नाही. ...
बीड : कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करूनही काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आटोक्यात येत नाही. हाच धागा पकडून आता आरोग्य विभागाने अशा लोकांना पकडून अँटिजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याला सोमवारपासून सुरूवात होणार असून बीड व अंबाजोगाईत यासाठी १५ पथकांची नियूक्ती केली आहे. यात पोलिसांचाही समावेश असणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज बाधितांची संख्या दीड हजारीपार जात आहे. तसेच मृत्यूही वाढत आहेत. वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परंतू याचे लोक पालन करत नसल्याचे समोर येत आहे. काही काम नसतानाही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहेत. वारंवार आवाहन करूनही ऐकत नसल्याने आता जे लोक रस्त्यावर दिसतील त्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. याला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. यासाठी बीडमध्ये १० व अंबाजोगाईत ५ पथकांची नियूक्ती केली आहे. यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांचाही समावेश असणार आहे. जे लोक याला विरोध करतील त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सिव्हील, स्वारातीत स्वतंत्र पथक
जिल्हा रूग्णालय व स्वाराती रूग्णालयात रूग्णांना भेटणाऱ्यांसह पुढारपण करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथूनच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे येथेही विनाकारण आलेल्या लोकांची चाचणी करण्यासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियूक्ती केली आहे.
बाधितांना ठेवणार कोठे?
सध्या रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. त्यातच आता कॅम्प घेऊन व अशा प्रकारे लोकांना पकडून चाचणी केली जात आहे. यात जर बाधितांची संख्या वाढली तर त्यांना ठेवणार कोठे? हा प्रश्न आहे. आगोदर खाटांची व्यवस्था करावी आणि मगच अशा प्रकारे मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोट
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची सोमवारपासून ॲन्टिजन चाचणी केली जाईल. बीड व अंबाजोगाईत १५ पथके नियूक्त केले आहेत. जिल्हा रूग्णालय व स्वारातीत स्वतंत्र पथके असतील. आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा पथकात समावेश असेल. जे लोक विरोध करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. बाधितांना सीसीसीमध्ये पाठविले जाईल.
डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड