गेवराईत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:35+5:302021-04-25T04:33:35+5:30
गेवराई : शहरातील मोंढा नाका येथे विनाकारण रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांची अँटिोन चाचणी करण्याची मोहीम शनिवारी ...
गेवराई : शहरातील मोंढा नाका येथे विनाकारण रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांची अँटिोन चाचणी करण्याची मोहीम शनिवारी प्रशासनाने राबविली. यात ७८ जणांच्या तपासणीत दाेघे जण पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारा जणांवर कारवाई करण्यात आली.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असून यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मोंढा नाका परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यावेळी दोन तासांत जवळपास ७८ जणांची तपासणी करण्यात आली. यात दोघे पाॅझिटिव्ह निघाले. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, नगर परिषदेचे अधिकारी तसेच तलाठी जितेंद्र लेंडाळ, मंडळ अधिकारी गजानन देशमुख , मिसाळ, पोलीस अधिकारी, महसूलचे कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते. या कारवाईमुळे दुपारनंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.
पाच दुकानांवर कारवाई
अँटिजेन चाचणीच्या मोहिमेनंतर तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मोंढा भागात शिथिल वेळेनंतरही उघडी असलेल्या पाच दुकानदारांविरूद्ध कारवाई करीत प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला. यावेळी शहरात विना मास्क फिरणाऱ्या सात जणांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात आला. ही मोहीम दररोज शहरातील विविध भागात राबवली जाणार असल्याचे तहसीलदार सचिन खाडे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी सांगितले.
फोटो ओळी : शनिवारी गेवराईत शिथिल वेळेनंतर फिरणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांची कोविड अँटिजेन चाचणी करण्यात आली.
===Photopath===
240421\20210424_112024_14.jpg~240421\20210424_111855_14.jpg