अंत्योदय कार्डधारकांना मोफतचे रेशन मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:33+5:302021-05-16T04:32:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : लॉकडाऊनमध्ये प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र शासनाने गहू व तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन मार्च ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : लॉकडाऊनमध्ये प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र शासनाने गहू व तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन मार्च महिन्यात दिले होते; परंतु एप्रिल महिन्यात हे धान्य न आल्याने वाटप केले नव्हते. मागील आठवड्यात हे धान्य येऊनहीदेखील वाटप न केल्याने कार्डधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करीत असताना सर्वसामान्यांची होरपळ होऊ नये म्हणून प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी व्यक्तीला तीन किलो गहू व २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल महिन्यात हे मोफतचे धान्य मिळेल, अशी आशा होती; परंतु हे धान्य एप्रिल महिन्यात न आल्याने ते वाटप करता आले नव्हते. हे धान्य मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आले होते. हे धान्य येऊन आठवडा उलटला असताना येथील महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे धान्य अद्याप वाटप होऊ शकले नाही.
....
माजलगाव तालुक्यात प्राधान्य कार्डधारकांची संख्या ४० हजार २२५ असून, त्यात १ लाख ५० हजार ५९६ लोकांचा समावेश होतो, तर अंत्योदय कार्डधारकांची संख्या ३ हजार ४१२ असून, या कार्डवर १३ हजार ४१७ लोकांचा समावेश होतो.
....
इतर ठिकाणी वाटप
४५ हजार कार्डधारकांना उशिरा मोफतचे धान्य मिळत असताना व बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी मोफत धान्य वाटप होत आहे. असे असताना येथील तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अद्याप धान्य मिळू शकले नसल्याचा आरोप या कार्डधारकांतून होत आहे.
------
प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना जे मोफत धान्य देण्यात येणार आहे ते धान्य आपणास उपलब्ध झाले आहे. या कार्डधारकांचा डेटा न आल्यामुळे हे धान्य वाटपास उशीर होत आहे.
--एस.टी. कुंभार, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग.