अंत्योदय, अन्नसुरक्षाधारकांना धान्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:44+5:302021-05-15T04:31:44+5:30
धारूर : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना ...
धारूर : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांना १३ मे पासून मोफत धान्य वाटप करण्यास सुरुवात झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थी प्रति व्यक्तीस ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असा पाच किलो धान्य मे व जूनमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य, तसेच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (३ किलो गहू व २ किलो तांदूळ) मे या एका महिन्यासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, तर शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य मिळणार नसून दरमहाप्रमाणे त्यांना धान्य मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे.
सणाला आले धान्य
गुरुवारी
अक्षय तृतीया, रमजान ईदचे औचित्य साधून तहसीलच्या पुरवठा विभागाने १३ मे रोजी मे महिन्याचे धान्य वाटप सुरू केले. ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा घेण्याची आवश्यकता नाही. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदारांचा अंगठा लावून धान्य वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाबाबतचे नियम पाळावे
धान्य वाटप करताना दुकानदार व लाभार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टन्स्टिंग, सॅनिटायझर, आदी कोविड नियमांचे पालन करावे. शहरातील लाभार्थ्यांना कोविड-१९ चे सर्व नियम पाळून याचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. लाभार्थ्यांनी धान्य घेऊन जावे असे आवाहन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.
===Photopath===
130521\2715img-20210513-wa0232_14.jpg