'अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:11 PM2022-06-03T12:11:31+5:302022-06-03T12:28:48+5:30
' ३ जूनचा काळा दिवस आजूनही आठवतो, तो दिवस उजाडलाच नसता तर...'
परळी ( बीड ) : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनी परळी येथील गोपीनाथ गड येथे आज सकाळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक झाले. सकाळीच ट्विटकरून त्यांनी, ' ३ जूनचा काळा दिवस आजूनही आठवतो, तो दिवस उजाडलाच नसता तर...' अशा भावना व्यक्त केल्या होत्या. 'अप्पा तुमचा आवाज आजही कानात घुमतो', अशी साद घालत मंत्री मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर राज्यातील राजकारण वेगळे असते, असेही ते यावेळी म्हणाले.
परळी येथील गोपीनाथ गड येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी उसळली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज सकाळी गोपीनाथ गड येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंत्री मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर राज्यातील राजकारण वेगळे असले असते. जे मागील पाच सहा वर्षांपासून सुरु आहे ते झाले नसते अशी आशा व्यक्त केले. यासोबतच त्यांचे सामान्य माणसांप्रती, उसतोड मजुरांसाठी असलेले स्वप्न आज सत्तेत असताना मी पूर्ण करत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक वर्ष त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिल्याने त्यांची कुटुंबातील, सामाजिक, राजकीय जीवनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहील अशी ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांच्या भेटीवर
राजकीय विरोध वेगळा. संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या स्मृतींपुढे नतमस्तक होणे स्वाभाविक आहे. आजच्या पिढीच्या कुठल्याही नेत्याकडून स्वयंस्फुर्तीने, मनातून झालेले कृत्य आहे, असे मत मंत्री मुंडे यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गोपीनाथ गडास भेटीवर व्यक्त केले.
अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस... आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर...😢
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2022
अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो!
भावपूर्ण आदरांजली अप्पा... #RememberingGopinathraoMunde#GopinathMunde#लोकनेतेpic.twitter.com/8PjhDbZUoS
वडिलांसोबत वाद घालून मला राजकारणात आणले
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ते ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते तेथे मला उभे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रसंगी माझे वडील स्व. पंडित अण्णा यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. त्या गटातून मी निवडणूक लढवली आणि माझ्या सक्रीय राजकारणाची सुरुवात झाली. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी मला तिकीट देण्याचा घेतलेला तो निर्णय, तो विजय माझ्यासाठी कलाटणी देणारा ठरला. स्व. मुंडे यांची प्रेरणा घेऊन माझे कार्य अखंड सुरु असल्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली.