आवक नसल्याने सफरचंदाचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:02+5:302021-05-23T04:33:02+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सफरचंदाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने सफरचंदाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १०० ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सफरचंदाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने सफरचंदाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १०० रुपये किलोच्या दराने विकले जाणारे सफरचंद आता १७० ते १८० रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागले आहेत. लॉकडाऊनमुळे बंद असलेला बाजार व फळांची कमी होत असलेल्या आवकीमुळे सफरचंद, द्राक्षांबरोबरच इतर फळांचेही भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.
खाद्यतेलात दरवाढ
अंबाजोगाई : शेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाच्या दरात या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ११० रुपये प्रतिकिलो मिळणारे तेल आता १४५ ते १५० रुपये झाले आहे. याशिवाय गॅसचे दरही भडकले आहेत. पेट्रोलचे दरही वाढले आहेत. एकूणच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले असून, दाद मागावी तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुलांची काळजी घ्या
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी लहान मुलांची पालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे, तसेच लहान मुलांना घराबाहेर पडण्यासाठी खबरदारी बाळगावी. असे आवाहन श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल मस्के यांनी केले आहे.
प्रभागनुसार समित्या स्थापन करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी व शहरी व ग्रामीण भागात नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार समिती स्थापन करणे गरजेचे आहे. समितीतील लोक नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करतील व याची पोलीस यंत्रणेला व स्थानिक प्रशासनाला याची मोठी मदत होणार आहे. यासाठी अशा समित्या स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकर घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी यांनी केली आहे.
आंबा उत्पादकांना मदत करा
अंबाजोगाई : यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावरान व केशर आंबा मोठ्या प्रमाणात रखडला होता. मात्र, मार्च महिन्यात सलग दोन वेळा झालेल्या गारपिटीमुळे लागलेले आंबे गळून पडले, तर अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघात आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी भाजपाचे अनंत अरसुडे यांनी केली आहे.