नवीन अट, कोरोना सानुग्रह अनुदानासाठी ९० दिवसांच्या आत करा अर्ज
By शिरीष शिंदे | Published: August 31, 2022 05:38 PM2022-08-31T17:38:05+5:302022-08-31T17:38:25+5:30
कोराेना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जातात.
बीड : कोरोना आजारामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी ९० दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भाने नुकताच आदेश काढला आहे.
कोराेना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जातात. ही योजना राज्यभरात २६ नोव्हेंबर २०२१ पासून लागू आहे. या योजनेकरिता संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने छाननीअंती मंजूर केलेल्या अर्जदारांच्या बँक खात्यात हे अनुदान बँकेमार्फत थेट जमा केली जाते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही नवीन अट घालण्यात आली आहे. कोरोना आजारामुळे दि. २० मार्च २०२२ पासून पुढे मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत सानुग्रह साहाय्य योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. जर विलंब झाला तर जिल्हा निवारण समितीमार्फतच गाऱ्हाणे दाखल केले जाऊ शकतील.