उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:05 AM2019-05-08T00:05:23+5:302019-05-08T00:07:09+5:30
अंबाजोगाई नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठराव आज आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला.
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठराव आज आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला. नगर पालिकेतील २२ सदस्य आणि नगराध्यक्षा रचना मोदी असे एकूण २३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर सारंग पुजारी यांच्यासह त्यांच्या बाजूचे सहा नगरसेवक गैरहजर राहिल्याने २३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव संमत झाला.
२०१६ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी काँँग्रेसच्या रचना मोदी निवडून आल्या पण राष्ट्रवादीचे निम्म्यापेक्षाही अधिक सदस्य निवडून आल्याने उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले. प्रत्येक वर्षी एका सदस्याला उपनगराध्यक्ष पद देण्याचे पक्षांतर्गत तडजोडीत ठरले. त्यानुसार गटनेतेपदासह उपनगराध्यक्षपद पुजारी यांच्याकडे देण्यात आले.
परंतु, अडीच वर्षे पूर्ण होत आली तरी पुजारी हेच उपनगराध्यक्ष पदावर कायम असल्याने राष्ट्रवादीतील ९ सदस्यांच्या गटाने पुजारी यांच्या विरोधात मोहीम उघडत अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या.
त्याला काँग्रेसच्या ७ आणि भाजपच्या ६ सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे मागील आठवड्यात २२ सदस्यांच्या सह्यांसह अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला. त्यानंतर लागलीच हे सर्व सदस्य सहलीवर निघून गेले. हा ठराव नामंजूर व्हावा यासाठी पुजारी यांनी बरीच धावपळ केली. बारामतीची वारी देखील झाली. परंतु एकाही असंतुष्ट सदस्याला फोडण्यात त्यांना यश आले नाही. आज मंगळवारी सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावावर चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सहलीवर गेलेल्या सदस्यांनी आज सकाळी ११ वाजता थेट नगर पालिका सभागृहातच हजेरी लावली.
यावेळी सारंग पुजारी आणि त्यांच्या सोबत असलेले सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटातच उपनगराध्यक्ष पुजारी यांच्यावरील अविशासाचा ठराव २३ विरुद्ध शून्य असा आवाजी मतदानाने मंजूर झाला.
नगराध्यक्षा रचना मोदी यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. ठराव पारित होताच सदस्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रचना मोदी यांनी तर मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून काम पहिले.
राकाँचा स्वत:च्या उपनगराध्यक्षाविरुद्ध ‘व्हीप’
आजच्या सभेत उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असा व्हीप सभागृहातील गटनेत्या राजश्री अशोक मोदी यांनी सोमवारी जारी केला होता.
एखाद्या पक्षावर स्वत:च्याच पदाधिकाऱ्याविरोधात मतदान करा, असे सांगण्याची नामुष्की येण्याची ही अंबाजोगाई न.प.तील पहिलीच वेळ होती. कॉंग्रेस आणि भाजपने देखील ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असा व्हीप त्यांच्या नगरसेवकांना जारी केला होता.
अविश्वास ठराव मंजूर होण्याची दुसरी वेळ
अंबाजोगाई नगर पालिकेच्या इतिहासात अविश्वास ठराव मंजूर होण्याची ही दुसरीच वेळ आहे.
यापूर्वी माजी नगराध्यक्ष महादू मस्के यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर आज उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठराव
मंजूर झाला.