बीड जिल्हा बॅँकेच्या सुधारित आकृतीबंधास मिळाली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:15 AM2019-10-03T00:15:44+5:302019-10-03T00:16:33+5:30
राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या सुधाारित आकृतीबंधास २३ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आलेली असून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ५३४ सेवकमांड (आकृतीबंध) राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार बॅँकेच्या पटावर ५३४ सेवक काम करु शकणार आहेत.
बीड : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या सुधाारित आकृतीबंधास २३ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आलेली असून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ५३४ सेवकमांड (आकृतीबंध) राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार बॅँकेच्या पटावर ५३४ सेवक काम करु शकणार आहेत.
संगणकीकृत प्रणालीसज्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांसाठी सेवकमांड व सेवक भरतीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नाबार्डचे उपमहाप्रबंधकांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली होती. या समितीने नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाकडे अहवाल दिल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली. मानव संसाधन विकास धोरणातील तरतुदी अंतर्गत सेवकमांड व सेवकभरतीच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक तत्व निर्गमित केले होते. या अनुषंगाने बीड जिल्हा बॅँकेकडून परिपूर्ण प्रस्ताव दाखल केला होता. आर्थिक स्थितीनुसार ३१ मार्च रोजी जिल्हा बॅँकेचा प्रवर्ग ब, एकूण ठेवी ६२४.१२, येणे कर्ज १०८१.६४ कोटी असा १७०५.७६ कोटी रुपये व्यवसाय असल्याबाबत माहिती सदर प्रस्तावात दिली होती. त्याचबरोबर ३१ मार्च २०१५ अखेरची आर्थिक स्थितीसह १७७०.०१ कोटी रुपये व्यवसायाची माहिती देण्यात आली होती. कार्यबलाच्या अहवालानुसार ब प्रवर्गातील बॅँकांसाठी एकूण ५ विभाग आणि २० उपविभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बॅँकेने अस्तित्वातील विभागांची पुनर्रचना करुन ८ मुख्य विभाग निर्माण केले. तसेच बॅँकेच्या मुख्यालय विभागनिहाय व श्रेणीनिहाय १४७ पदांचा सेवकमांड मंजूर करण्यात आला.
जिल्हा बॅँकेच्या ५९ शाखांची चार गटात वर्गवारी करुन पदांचा सेवकमांड शाखेसाठी तयार केला. त्यानुसार ३७८ पदे निर्माण केली आहेत. अशा प्रकारे नाबार्डकडील कार्यबलाच्या सूचना तथा अहवालाचा विचार करुन ५३४ पदांचा सेवकमांड मंजूरीसाठी सादर केला होता. त्यानुसार या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
हा सेवकमांड ३१ मार्च २०२० या कालावधीपर्यंत कायम राहणार आहे. या मंजूर सेवकमांडपेक्षा कोणत्याही परिस्थितीत जादा कर्मचारी बॅँकेच्या पटावर असणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याची सूचना राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी बॅँक व्यवस्थापनाला केली आहे.