आष्टीत तीन खाजगी कोविड सेंटरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:33 AM2021-04-07T04:33:58+5:302021-04-07T04:33:58+5:30
आष्टी : शासकीय कोविड सेंटरसह आष्टी येथे आणखी तीन खाजगी कोविड सेंटरला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आ. बाळासाहेब आजबे ...
आष्टी : शासकीय कोविड सेंटरसह आष्टी येथे आणखी तीन खाजगी कोविड सेंटरला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आ. बाळासाहेब आजबे यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात सोमवारी विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. आजबे म्हणाले की, आष्टी येथे शासकीय कोविड सेंटरसह आणखी तीन खाजगी कोविड सेंटरला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये ध्रुव कोविड सेंटर, मोहरकर हॉस्पिटल , सोनवणे हॉस्पिटल येथे आयसीयू रूग्णांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या बिल्डिंगमध्ये ८० बेडची व्यवस्था असून ५० बेड हे आयसीयू असणार आहेत व इतर ठिकाणीही ४० बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये अंग झटकून कामाला लागले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये सक्रिय सहभागी व्हावे. हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना आ. आजबे यांनी केल्या. या बैठकीला तहसीलदार राजाभाऊ कदम, ना.तहसीलदार प्रदीप पांडुळे, ना.तहसीलदार नीलिमा थेऊरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल टेकाडे,सपोनि भारत मोरे, मुख्याधिकारी नीता अंधारे, प्रेमकुमार मस्के, उप अभियंता जोर्वेकर, महावितरणचे प्रवीण पवार, बीइओ सुधाकर यादव, शाखा अभियंता देव मॅडम ,विस्ताराधिकारी बारस्कर, काकासाहेब शिंदेसह अधिकारी उपस्थित होते.
औषधाविना रूग्ण वंचित राहू नये
कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात औषध खरेदीसाठी गरज पडल्यास आमदार निधीमधून पैसे देण्यात येतील परंतु औषधाविना कोणीही पेशंट वंचित राहता कामा नये. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध व्हावा यासाठी आ. आजबे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तत्काळ फोन लावत विनंती केली. त्यास मंत्री महोदयांनी होकार दिला असल्याचे आ. आजबे यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता लस घेण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे, आष्टी, कडा, धानोरा ,धामणगाव यासारख्या मोठ्या गावातील व्यापाऱ्यांनी सरसकट टेस्ट करून घ्यावी. गावामध्ये मोकार फिरणारांना पोलिसांनी समज द्यावी. सरपंच, ग्रामसेवक व कृषी साहाय्यकांनी आपल्या गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करावी. परवानगीशिवाय अधिकारी व कर्मचारी यांनी आपले मुख्यालय सोडू नये, अशी सूचना आ. आजबे यांनी यावेळी केली.
===Photopath===
060421\06bed_11_06042021_14.jpg