पेठबीड पोलिसांची मनमानी, आरोग्य वर्धिनी केंद्रातील चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ
By सोमनाथ खताळ | Published: April 25, 2023 03:32 PM2023-04-25T15:32:15+5:302023-04-25T15:32:44+5:30
आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी ठाण्यात ताटकळले
बीड : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू केले जात आहेत. याच केंद्रातील फर्निचर व इतर साहित्य असे जवळपास दोन लाख रूपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याची तक्रार देण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी सकाळी १० वाजेपासून पेठबीड ठाण्यात बसून आहेत. परंतू वेगवेगळे कारणे सांगून त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तक्रार घेतली नसल्याने पेठबीड पोलिसांविरोधात रोष व्यक्त होत आहे.
बीड शहरात सहा ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र तर एका ठिकाणी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. १ मे पासून या सर्व ठिकाणी रूग्णसेवा मिळणार आहे. त्यामुळे किरायाने घेतलेल्या जागेत फर्निचर व इतर आवश्यक साहित्य ठेवण्यात आले होते. तेलगाव नाका येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील जवळपास दोन लाख रूपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दरवाजाचा कोंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. याचीच तक्रार देण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी पेठबीड पेालिस ठाण्यात गेले होते. परंतू तक्रार घेणे तर दुरच परंतू यांनाच उलट चौकशा करण्यात आल्या. शिवाय मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वेगवेगळे कारणे सांगून तक्रार घेतली नाही. शासनाच्याच लोकांना अशाप्रकारे वागणूक दिली जात असेल तर सामान्यांना कशी सेवा मिळत असेल? असा प्रश्न आहे. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
माहिती घेतो
मी सध्या औरंगाबादला आहे. फिर्याद दाखल करून घेण्यासाठी ठाणे प्रमुख लागतात, असे काही नाही. मी नेमकी माहिती घेतो.
रामचंद्र पवार, सहायक पोलिस निरीक्षक पेठबीड
तक्रार घेतली नाही
तेलगाव नाका परिसरातील आरोग्य वर्धिनी केंद्रात चोरी झाली आहे. जवळपास २ लाख रूपयांचे साहित्य चोरी गेले आहे. याची तक्रार देण्यासाठी आमचे अधिकारी, कर्मचारी पेठबीड पोलिस ठाण्यात गेले होते. परंतू अद्याप ती घेतलेली नाही. दुपारनंतर या, असा सल्ला दिल्याचे पथकाने मला सांगितले.
- डॉ.नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी बीड