यंत्रणेच्या मनमानीमुळे घरकुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:23+5:302021-01-22T04:30:23+5:30
धारूर : तालुक्यातील आसोला येथील पंतप्रधान घरकूल योजनेतील ६८ लाभार्थींच्या खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये अनुदान पंचायत समितीकडून ...
धारूर : तालुक्यातील आसोला येथील पंतप्रधान घरकूल योजनेतील ६८ लाभार्थींच्या खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये अनुदान पंचायत समितीकडून जमा केले आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे व्यवहार ठप्प केल्याने लाभार्थी घरकुल योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.
धारूर तालुक्यातील आसोला येथे पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६८ घरकुल मंजूर झाले होते. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर जागेवर जाऊन पंचायत समितीच्या अभियंत्यांनी जिओ टॅगिंग केली. सर्व कागदपत्रे व्यवस्थित झाल्यावर या घरकुलाचा पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते. परंतू घरकुल विभागाने संबंधित खात्याचे व्यवहार ठप्प ठेवण्याचे पत्र देऊन या खात्याचे व्यवहार तात्पूरत्या स्वरूपात बंद केले. त्यामुळे या सर्व घरकुलांचे काम ठप्प झाले आहेत. हेतूपुरस्सर हा प्रकार करण्यात आला असून संबंधित अभियंता व ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे घरकुलाची कामे रखडली आहेत. ती कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी किसान सभेचे तालुकाध्यक्ष ॲड. संजय चोले यांनी केली आहे.