जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानी; सीएसच्या सकाळच्या राऊंडला हजर, दुपारनंतर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:20 PM2020-12-02T19:20:29+5:302020-12-02T19:23:00+5:30

ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी गायब राहत असून, शिकाऊ डॉक्टरांवर रुग्ण तपासण्याची जबाबदारी टाकली जात आहे. 

Arbitrariness of unruly doctors in Beed district hospitals; Attended the morning round of CS, disappeared in the afternoon | जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानी; सीएसच्या सकाळच्या राऊंडला हजर, दुपारनंतर गायब

जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानी; सीएसच्या सकाळच्या राऊंडला हजर, दुपारनंतर गायब

Next
ठळक मुद्दे स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानीकेवळ एक डॉक्टर वगळता सर्वच गायब होते.

- सोमनाथ खताळ

बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील डॉक्टरांची बेशिस्त कायम आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सकाळी राऊंड घेतला तेव्हा सर्वच हजर होते. आता हीच स्थिती कायम दिसेल असा दावा डॉ. गित्ते यांनी केला होता. दुपारनंतरच्या ओपीडीला भेट दिली असता केवळ एक डॉक्टर वगळता सर्वच गायब होते. यावरून त्यांचा हा दावा फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. ओपीडीत कोणीही नसल्याने रुग्णांना मात्र ताटकळत बसून रिकाम्या हाताने परतावे लागले. 

सामान्यांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो; परंतु बीड जिल्हा रुग्णालयात सुविधा व सेवा व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसत आहे. डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तरी यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे मंगळवारी आदित्य महाविद्यालयात जाऊन राऊंडही घेतला. सर्वांना सूचनाही केल्या; परंतु या सूचना काही तासच राहिल्या. दुपारच्या ओपीडीत केवळ एकच डॉक्टर वेळेवर हजर होते. इतर डॉक्टर उशिराने आले, तर बालरोगतज्ज्ञ फिरकलेच नाहीत. हा सर्व प्रकार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व डॉ. आय.व्ही. शिंदे यांच्यासमोर झाला. डॉक्टरांची बेशिस्त व वरिष्ठांचे अभय याचा फटका दूरवरून आलेल्या सामान्य रुग्णांना बसत आहे. दरम्यान, यापूर्वीही बेशिस्त डॉक्टरांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी गांधीगिरी पध्दतीने फूल देऊन स्वागत केले होते. नंतर काही दिवस सुधारणा झाली. आता पूर्ववत स्थिती झाल्याचे दिसते.

कोठे काय आढळले ?
दुपारी ४.३० वाजता ओपीडी विभागाला भेट दिली. खुद्द डॉ. सुखदेव राठोड यांची खुर्ची रिकामी होती. त्यानंतर स्त्रीरोग व एनसीडी विभागातील डॉक्टर ४.४५ वाजता आले. सर्जरीचे डॉक्टर ५ वाजेपर्यंत आले नव्हते. अस्थिरोगतज्ज्ञ वेळेवर हजर होते. बालरोगतज्ज्ञ तर आलेच नाहीत. दंत व डोळ्यांच्या ओपीडीत डॉक्टरच होते. मानसिक आरोग्य विभागात तर डॉक्टर सोडून समाजसेवा अधीक्षकच औषधी लिहूून देत होते, तसेच ५ पर्यंत मेल व फिमेल सर्जिकल आणि सीझर वॉर्ड वगळता कोणताच राऊंड झालेला नव्हता. 

शिकाऊंवर ओपीडीचा भार
ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी गायब राहत असून, शिकाऊ डॉक्टरांवर रुग्ण तपासण्याची जबाबदारी टाकली जात आहे. वास्तविक पाहता बाजूला एमओ असल्यानंतरच शिकाऊंनी उपचार करणे गरजेचे असते; परंतु येथे असे दिसत नाही. 

मी जुन्या जिल्हा रुग्णालयात होतो. गैरहजर लोकांना नोटीस बजावली जाईल. थोड्या अडचणी आहेत, त्यात सुधारणा करू.
    - डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

सामान्य रुग्णांना सेवा व सुविधा मिळावी, हे योग्यच आहे. ओपीडीची माहिती घ्यायला एसीएसला सांगतो. - डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
 

Web Title: Arbitrariness of unruly doctors in Beed district hospitals; Attended the morning round of CS, disappeared in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.