गेवराई तालुक्यात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र अडीच पटीने वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:34+5:302021-04-06T04:32:34+5:30
विष्णू गायकवाड गेवराई : मुबलक प्रमाणात उपलब्ध पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील सर्व दहा महसूल मंडळांत मागील वर्षीच्या तुलनेत ...
विष्णू गायकवाड
गेवराई : मुबलक प्रमाणात उपलब्ध पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील सर्व दहा महसूल मंडळांत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी हंगामातील बाजरीच्या पेऱ्यात जवळपास अडीच पटीने वाढ झाली आहे.
तालुक्यात गेवराई, धोंडराई, रेवकी, उमापूर, जातेगाव, चकलांबा, पाचेगाव, सिरसदेवी, मादळमोही, तलवाडा अशी दहा महसूल मंडळे आहेत. यावेळी १०० टक्के पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व सातही लघु प्रकल्पांत मुबलक पाणी आहे. पैठण येथून माजलगावकडे जाणाऱ्या उजव्या कालव्यामध्ये सिंचनासाठी नियमितपणे पाणी सोडण्यात येत असल्याने, तसेच गोदावरीच्या पात्रातही पाणी असल्याने तालुक्यातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणी उन्हाळी पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत ऊस, भुईमूग, उन्हाळी बाजरी, मका, कडवळ आदी पिके घेतली जात आहेत. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील दहाही महसूल मंडळांच्या ठिकाणी उन्हाळी बाजरीच्या पेरणीत वाढ झाली. उमापूर मंडळात सर्वांत जास्त उन्हाळी बाजरीचा पेरा झाला आहे. त्यानंतर तालुक्यातील जातेगाव भागात बाजरीचा पेरा आहे. तालुक्यातील इतर ठिकाणीही काही प्रमाणात कापूस, तूर, ज्वारी, हरभरा आदी पिके काढून उन्हाळी बाजरीचा पेरा करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत उन्हाळी बाजरीचे पीक जोमात आहे. काही ठिकाणी बाजरी फुलोऱ्यात आहे, तर काही ठिकाणी दाणे भरले आहेत. अशा परिस्थितीत या पिकाला संरक्षित पाणी देणे आवश्यक असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर यांनी सांगितले.
उसाचे क्षेत्रही वाढले
गेवराई तालुक्यातील उजव्या कालव्यात नियमितपणे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असून, गोदावरीच्या पात्रात पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असल्याने उसाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत जवळपास १८ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात उसाची लागवड आहे.
गेवराई तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये ५० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गोविंदवाडी लघु प्रकल्पात ५९ टक्के, जव्हारवाडी ४९ टक्के, मादळमोही ५५ टक्के, बंगाली पिंपळा ६४ टक्के, शिंदेवाडी ५४ टक्के, खडकी ५४ टक्के, चकलांबा लघु प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
१,३५,००० हजार हेक्टर गेवराई तालुक्यात एकूण पेरणीलायक क्षेत्र
१६५२ हेक्टरवर मागील वर्षी उन्हाळी बाजरीचा पेरा
३८०० हेक्टर क्षेत्रात या वर्षात उन्हाळी बाजरीचा पेरा
------------
फोटो ओळी : गेवराई तालुक्यातील ईटकूर शिवारातील उन्हाळी बाजरी जोमात आहे. छाया : विष्णू गायकवाड
===Photopath===
050421\img-20210405-wa0294_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील ईटकुर शिवारातील उन्हाळी बाजरी जोमात आहे. छाया : विष्णु गायकवाड