बीडजवळच्या गोरेवस्तीवर सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:11 AM2019-11-12T00:11:50+5:302019-11-12T00:12:31+5:30
शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.
बीड : शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय कुटुंबियांना असल्याने हा दरोडा आहे की वैयक्तिक वादातून झालेला प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
लोभाजी जगताप, पत्नी मीनाबाई व मुलगा अशोक हे घरात झोपलेले होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास १० ते १२ अनोळखी लोकांनी घरात प्रवेश केला. जगताप यांच्या मुलाला काठीने व कोयत्याने मारहाण सुरु केली. यात अशोकचा हात फॅक्चर झाला. त्यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या आशाबाई मोराळे व त्यांचा मुलगा विकास यालाही मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांचे हात व पाय बांधून ठेवले. मारहाणीनंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यातील आरोपी हे २० ते ३० वयोगटातील असल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बºयाच वेळाने एकाचा हात सुटल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास घटनास्थळी धाव घतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मीनाबाई जगताप यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात १०-१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सोपनि सुजित बडे हे करत आहेत. दरम्यान फिर्यादीने ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी करण्यात आली.
मामाच्या फोनवरून पोलीस पोहचले घटनास्थळी
घरातील सदस्यांना मारहाण केल्यानंतर बांधून ठेवले होते. सर्व मुद्देमाल घेऊन दरोडेखोर लंपास झाल्यानंतर भितीचे वातावरण होते. यावेळी यांच्यातील एकाने आपले हात कसेबसे सोडवले व मामाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यांचे मामा हे मुंबई येथे होते, त्यांनी पोलीस कंट्रोलला फोन करून सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.