रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था, बाहेर नातेवाइकांचे बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:54+5:302021-04-19T04:30:54+5:30
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी आधार केंद्र आहे, तर नव्याने सुरू झालेल्या ...
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी आधार केंद्र आहे, तर नव्याने सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अंबाजोगाईत दोन्ही कोविड सेंटरवर जवळपास ७०० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. अंबाजोगाईत उपचार पद्धती चांगली मिळते, या कारणामुळे रुग्णांचा मोठा विश्वास असल्याने दूरवरून रुग्ण उपचारासाठी अंबाजोगाईत येतात. येथील रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, धारूर, केज, गंगाखेड, कळंब व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. या रुग्णांना रुग्णसेवाही दर्जेदार मिळू लागल्याने इथे रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी नातेवाईकही सोबत आलेले असतात. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात अद्ययावत उपाहारगृह, मेडिकल स्टोअर व सर्व सुविधा आहेत. त्या तुलनेत लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. लोखंडी सावरगावचे कोविड केअर सेंटर अंबाजोगाई शहरापासून दहा कि.मी. अंतरावर आहे. या परिसरात औषधांची दुकाने नाहीत. उपाहारगृह नाही. जवळपास कसलेही दुकान नाही. ना रिक्षा मिळते, ना कसल्या वाहनाची उपलब्धता होते. अशा स्थितीत नातेवाइकांना तारेवरची कसरत करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. अनेकांना तर मोठा लांबचा पल्ला पार करून या सुविधा द्याव्या लागतात. त्यामुळे नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात दमछाक सुरू आहे.
औषध विक्रीचे दुकान हवे, पाण्याची सोय व्हावी
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लोखंडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये वडिलांना दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, डॉक्टरांनी सांगितलेली काही औषधे आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. या परिसरात प्रशासनाच्या वतीने अद्ययावत औषध विक्रीचे दुकान सुरू करावे, त्यामुळे नातेवाइकांची गैरसोय दूर होईल. तसेच नातेवाइकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व उपाहारगृह सुरू करावे, अशी मागणी प्रा. बिभीषण चाटे यांनी केली आहे.