थकबाकी, परमिटच्या नावाखाली वारंवार वीज वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:03+5:302021-04-09T04:35:03+5:30

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला ...

Arrears, frequent power outages in the name of permits | थकबाकी, परमिटच्या नावाखाली वारंवार वीज वीजपुरवठा खंडित

थकबाकी, परमिटच्या नावाखाली वारंवार वीज वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून, वीज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह लहान बालक व वयोवृद्ध नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वीज बिल वसुलीला सामोरे जावे लागत आहे.

वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारींचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून, वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मागील महिन्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. मागील काही दिवसांपासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित सेवेमुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. तत्काळ अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले की, यापुढे विजेचा लपंडाव होणार नाही याची काळजी घेण्यात येईल व तशा सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीवर प्रभावी उपाययोजना व नागरी सेवा पुरविण्यात परळीतील सर्व यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली आहे. अनेक दिवसांपासून परळीकर सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वैतागले आहेत. सुधारणा न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल - ॲड. अतुल तांदळे, अध्यक्ष

परळी वैद्यनाथ विकास व जिल्हा निर्मिती समिती.

मागील एक महिन्यापासून परळी शहरातील लॉकडाऊनमुळे सगळा व्यापार बंद आहे. तरीही वीज वितरणला वीज पुरवठा सुरळीतपणे करता येत नाही. दर अर्ध्या तासाला वीज पुरवठा खंडित होतो. वीज बिल वसुलीसाठी तत्पर असणाऱ्या वीज वितरण कंपनीने वीज पुरवठाही त्याच तत्परतेने केला पाहिजे. -अश्विन मोगरकर, भाजप कार्यकर्ते,

परळी वीज वितरणच्या आधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. लोकप्रतिनधींनी लक्ष देण्याची गरज आहे. - दिलीप जोशी, वंदे मातरम् सेना, परळी.

Web Title: Arrears, frequent power outages in the name of permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.