गावठी पिस्तुलासह आरोपीला केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:06 AM2019-09-11T00:06:13+5:302019-09-11T00:06:54+5:30
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून, हे पिस्तूल त्याने कोणाकडून व कशासाठी घेतले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
बीड : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून, हे पिस्तूल त्याने कोणाकडून व कशासाठी घेतले, याचा तपास पोलीस करीत आहेत. पाटोदा येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पो.नि. भारत राऊत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी पाटोदा परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान, या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये एक इसम संशयितरीत्या आढळला. सापळा लावून त्याला ताब्यात घेतले अन् झडतीमध्ये त्याच्या कमरेला पॅन्टच्या आतून खोचलेले गावठी पिस्तूल आढळून आले, ते जप्त करण्यात आले. पोलीस चौकशीत सदरील युवकाने त्याचे नाव प्रणव बाळासाहेब जावळे (रा. पाटोदा) असे सांगितले. त्याने हे गावठी पिस्तूल कोणाकडून आणले, कशासाठी घेतले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि भारत राऊत, उपनिरीक्षक संतोष जोंधळे, स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी भास्कर केंद्रे, मुंजाबा कुव्हारे, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, राजू वंजारे यांनी ही कारवाई केली.