आगमन 'दणक्या'त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:59+5:302021-09-11T04:33:59+5:30
घड्याळाकडे कटाक्ष टाकत त्याने महाराजांच्या शयनगृहात टूणकन् उडी मारली अन् आरशात पाहून स्वत:चा चेहरा निरखू लागला. कोरोना गो... गो ...
घड्याळाकडे कटाक्ष टाकत त्याने महाराजांच्या शयनगृहात टूणकन् उडी मारली अन् आरशात पाहून स्वत:चा चेहरा निरखू लागला. कोरोना गो... गो कोरोना... असा सूर आळवत त्याने डोक्यावरील केस नीटनेटके केले. बाप्पा आणखी अंथरुणातच होते. त्यांना जागे करावे तर झोपमोड होईल अन् नाही करावे तर भक्तगणांच्या भेटीला उशीर... काय करावे ते सुचेना, मग त्याला काही तरी 'आठवले' अन्
'कोरोना गो... गो कोरोना...'चा सूर वाढविला. बाप्पांना झोपेतून जागे करण्यासाठी त्याने लढवलेली ही शक्कल कामी आली.
बाप्पांनी कूस बदलली अन् डोळे उघडले. मूषक इन-शर्ट केलेला ड्रेस घालून त्यांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. गुड मॉर्निंग महाराज... म्हणत त्याने बाप्पांच्या हातात गुलाबपुष्प ठेवले. मुषकाचा उत्साह पाहून बाप्पांनीही फूल घेऊन नाकाजवळ नेले अन् दीर्घ श्वास घेत सुगंध नाकपुडीत ओढून घेतला. नाकावरचा चष्मा मागे सरकवत मूषक म्हणाला... महाराज फुलांचा इथेच 'फुल्ल' आनंद घ्या... तिकडे भक्तगणसुध्दा पूजेसाठी फुलं आणतील, पण कोरोनामुळे नाकावरचे मास्क काढता येणार नाही.
बाप्पांनी मूषकाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले अन् कळल्या तुझ्या भावना... म्हणत
रथ तयार ठेव... असे फर्मान सोडले. तोंडाला मास्क, हातात सॅनिटायझर अन् दहा दिवस मुक्कामासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची बॅग घेऊन रथ मार्गस्थ झाला. काय रे काही विसरला नाहीस ना... असा प्रश्न केल्यावर मुषकाने महाराज, सॅनिटायझर व मास्क आहे ना मग बाकी काहीका विसरेना. बाप्पांनी का बरं, असा प्रतिप्रश्न केल्यावर मूषक उद्गारला... महाराज, तुम्ही आंतर्यामी... तुम्ही विघ्नहर्ता... आपण 'आंखो देखा हाल' अनुभवालच. अरे हळू... हळू... असे म्हणत बाप्पांनी तोल सावरला तेव्हा मूषक म्हणाला.... महाराज, सांभाळून बसा. बीड आलंय.... इथे दरवर्षी आपले स्वागत 'दणक्या'तच होते, विसरलात व्हयं. तसे बाप्पांनी स्वत:ला सावरत कळलं.. कळलं.. म्हणत नाकावरुन खाली सरकलेला मास्क पुन्हा व्यवस्थित केला.
- मूषकराज
....