साखरपुडा झाल्याचे समजताच तरूणीचे अश्लिल फोटो पाठविले भावाच्या मोबाईलवर
By सोमनाथ खताळ | Published: January 30, 2024 07:37 PM2024-01-30T19:37:41+5:302024-01-30T19:38:27+5:30
हा प्रकार समजताच पीडित तरूणीने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
बीड : धारूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवून बदनामी करण्यात आली. हा प्रकार ११ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी केजच्या तरूणाविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर येथील तरूणी शिक्षणासाठी केजला होती. शाळा, महाविद्यालयात जाण्याच्या रस्त्यावर असणाऱ्या दुकानातील आशिष महादेव तेलंग या तरूणासोबत तिची ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर २०२३ मध्ये हे प्रकरण दोघांच्याही घरी समजले. त्यामुळे तरूणीच्या वडिलांनी तिचे लग्न जमवून साखरपुडाही केला. तरूणीच्या होणाऱ्या पतीने दोघांचे फोटो सोशल मिडीयावर टाकताच ते आशिष याने पाहिले. नंतर त्याने होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर व्हिडीओ आणि फाेटो पाठविले. त्यामुळे या तरूणीचा जमलेला विवाह मोडला. एवढ्यावरही आशिष शांत राहिला नाही. त्याने तरूणीच्या भावाच्या मोबाईलवर ११ जानेवारी रोजी अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठविले. हा प्रकार समजताच पीडित तरूणीने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशीगंध खुळे, गिरी आदी करत आहेत.